नवी मुंबईत लाच घेतल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई, ६ जून (वार्ता.) – आरोपीला साहाय्य करण्यासाठी ४० सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकुमार टकले आणि पोलीस नाईक प्रज्ञेश कोठेकर यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

यामधील तक्रारदार व्यक्तीच्या काकावर कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे एक गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात काकांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणीत साहाय्य करणे, तसेच उर्वरित गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करणे यांसाठी तक्रारदाराकडे टकले यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती. याविषयी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तडजोडीअंती ४० सहस्र रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना त्यांना रंगेहात पकडले.

संपादकीय भूमिका

  • पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीच अजून लाच घेत असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?

  • भ्रष्टाचाराने पोखरलेला भारत !