PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ने (‘एन्.डी.ए.’ने) मोठी आघाडी घेत बहुमत मिळवले आहे. ‘एन्.डी.ए.’ तिसर्‍यांदा सत्तेवर येणार आहे. त्यासाठी देहलीत हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ८ जून या दिवशी संध्याकाळी निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. ५ जून या दिवशी देहलीत ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ची बैठक पार पडली. या बैठकीत जनता दल (संयुक्त)चे प्रमुख नितीश कुमार, तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी झाले. मित्रपक्षांशी झालेल्या चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सरकार स्थापनेची रूपरेषा आणि शपथविधी यांवर चर्चा झाली.

वर्ष २०१९ च्या निकालानंतर ७ दिवसांनी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता, तर २०१४ मध्ये १० दिवसांनी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या लोकसभा निवडणुकीत ‘एन्.डी.ए.’ने २९२ जागा, तर ‘इंडी’ आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत.