US Media On Modi : (म्हणे) ‘मोदी यांना राजकीय धक्का बसला !’ – अमेरिकेची वर्तमानपत्रे

लोकसभा निवडणूक २०२४

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याचे वृत्त अमेरिकेतील वर्तमानपत्रांनीही प्रसिद्ध केले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने लिहिले, ‘लोकप्रिय पंतप्रधान त्यांच्या २३ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत राज्य किंवा केंद्रीय निवडणुका यांमध्ये बहुमत मिळवण्यात कधीही अपयशी ठरले नाहीत. गेल्या निवडणुकीत त्यांना दणदणीत विजय मिळाला होता; मात्र आता मोदी यांना राजकीय धक्का बसल्याचे दिसत आहे. मतदानाची आरंभीची आकडेवारी त्याच्या हिंदु राष्ट्रवादी पक्षाला कमकुवत पाठिंबा दर्शवते.’ (भाजपच्या हिंदु राष्ट्रवादाविषयी विदेशी प्रसारमाध्यमांना आक्षेप का ? अमेरिकेने देशहिताच्या दृष्टीने काही कृती केली, तर तो राष्ट्रवाद आणि अन्य देशांनी केली की ती एकाधिकारशाही, असेच अमेरिकी प्रसारमाध्यमांना वाटते. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)

१. न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले आहे की, नरेंद्र मोदींच्या भोवतीचे अजिंक्यतेचे आभाळ तुटले आहे. भाजपने त्याची सर्वांत आवडती जागा अयोध्या गमावली. उत्तरप्रदेशमधून भाजपला  धक्का बसला आहे.

२. फायनान्शियल टाइम्सने म्हटले आहे की, हा निकालामुळे भारतीय राजकारणात पुन्हा ‘युतीचे राजकारण’ खेळले जाईल. अनेक भारतियांना या निवडणुकीत मोदींच्या स्पष्ट विजयाची अपेक्षा होती. मोदींच्या कारकीर्दीच्या दशकातील सार्वमत म्हणून याकडे पाहिले जात होते.

३. अल् जझीरा वृत्तवाहिनीने म्हटले की, संसदेत आव्हाने असतील. अशी काही विधेयके आहेत जी संमत व्हायची आहेत आणि भाजपला त्यासाठी नक्कीच खूप तडजोड करावी लागेल. यापूर्वी त्यांना प्रचंड बहुमत मिळाले असतांना त्यांनी तडजोड केली नाही.

अयोध्येतील पराभव अनेकांसाठी धक्का ! – पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने बातमीत म्हटले आहे की,  भारतातील मतमोजणी मोदी आघाडीला आश्‍चर्यकारकरित्या अल्प बहुमताने विजयी झाल्याचे दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे उत्तरप्रदेशातील अयोध्येची जागा भाजपने गमावली आहे. या मतदारसंघात भाजपचा प्रतिष्ठित प्रकल्प श्रीराममंदिर आहे. अनेकांसाठी हा धक्का आहे. भाजपने अयोध्येतील पराभव स्वीकारला आहेे. राहुल गांधी म्हणतात, ‘मतदारांनी भाजपला शिक्षा केली आहे.’

संपादकीय भूमिका

भारताच्या यावर्षीच्या निवडणुकीमध्ये विदेशी आणि त्याहून अधिक अमेरिकी प्रसारमाध्यमांनी बरीच लुडबूड केली. निवडणूक एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये घेण्याविषयीही त्यांनी आक्षेप घेतला. याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यांच्याविषयीही उलटसुलट लिहिले. त्यामुळे मोदी तिसर्‍यांदा निवडून आल्यामुळे त्यांना पोटशूळ उठणारच !