‘१.७.२०२३ या दिवशी रात्री मी झोपले असतांना मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीशी बोलत आहे. मी देवीच्या मुखाकडे पाहून आत्मनिवेदन करत होते.’
१. देवीने साधिकेकडे पाहून स्मितहास्य करणे आणि साधिकेच्या शरिरावर रोमांच येणे
स्वप्नात मी देवीला माझ्या मनाची स्थिती सांगत होते. त्या वेळी देवीची मूर्ती निद्रावस्थेत होती, म्हणजे देवीचे डोळे झाकलेले होते. मी देवीशी बोलत असतांना अलगदपणे देवीची साडी नीट केली. त्या क्षणी देवीने डोळे उघडले आणि स्मितहास्य करून माझ्याकडे पाहिले. त्या वेळी माझ्या शरिरावर रोमांच आले. त्या क्षणी ‘प्रत्यक्ष देवीच तिथे आहे’, असे मी अनुभवले. माझे हात आपोआप जोडले गेले आणि मी देवीच्या चरणांवर डोके ठेवून कृतज्ञता व्यक्त केली.’
२. देवीने स्वप्नात दर्शन दिल्यामुळे साधिकेला आनंद होणे आणि तिने देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे
त्यानंतर मला जाग आल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला स्वप्न पडले होते.’ तोपर्यंत ‘मी देवीला प्रत्यक्षच पहात आहे’, असे मला वाटत होते. मला जाग आल्यावर पुष्कळ हलकेपणा जाणवला. मला आतून आनंद जाणवत होता. ‘देवीने मला दर्शन दिले’, याबद्दल माझी मनातून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ते क्षण इतके जिवंत होते की, ते स्वप्न आताही आठवले, तरी माझ्या शरिरावर रोमांच येतात.’
– सौ. स्नेहा सचिन हाके (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.७.२०२३)
|