ब्राह्मण समाज चुकल्यास ऐकून घ्या; पण विनाकारण कुणी शेपटीवर पाय दिला, तर सोडायचे नाही ! – (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

सांगली येथील कार्यक्रमात खासदार (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी यांचे आमदार अमोल मिटकरी यांना खडेबोल !

खासदार (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी आणि आमदार अमोल मिटकरी

सांगली, १ जून (वार्ता.) – साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण समाज चुकत असेल, तर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा; पण विनाकारण कुणी शेपटीवर पाय देत असेल, तर त्याला सोडायचे नाही, अशी चेतावणी भाजपच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना दिली. ३१ मे या दिवशी येथील ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते  करण्यात आला. तेव्हा त्या बोलत होत्या. या वेळी श्रीमंत पुष्करसिंह पेशवे, युवराज श्रीमंत आदित्य राजे विजयसिंह पटवर्धन, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, राज लक्ष्मी राजे पटवर्धन आदी उपस्थित होते.

खासदार (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल, तर सोडायचे नाही. त्यामुळेच पुरोहित आणि आपले मंत्र यांची चेष्टा करणारे आमदार अमोल मिटकरी ज्या व्यासपिठावर असतील, तेथे मी जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. ‘बारामती येथील सभेत अमोल मिटकरी ज्या व्यासपिठावर येणारे होते, त्या सभेच्या व्यासपिठावर येणार नाही’, अशी भूमिका मी घेतली; मात्र मिटकरी आलेच नाहीत. जे चुकीचे आहे, त्याला चुकीचे म्हणा. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. ब्राह्मणांवर टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका आणि नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा. देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एकटे पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया.’’

(म्हणे) ‘मेधा कुलकर्णी यांचे विधान घटना पालटायच्या चर्चेला बळ देणारे !’ – आमदार अमोल मिटकरी

अकोला – भाजपच्या खासदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेले विधान हे देशाची राज्यघटना पालटण्याच्या चर्चेला अधिकृत दुजोरा देणारे ठरू शकते. त्यांचा माझ्यासमवेत व्यासपीठ ‘शेअर’ न करण्याचा किस्सा धादांत खोटा आहे, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी १ जून या दिवशी येथे उधळली. ते म्हणाले की, मेधा कुलकर्णी व्यासपिठावर असल्यामुळे मीच व्यासपिठावर गेलो नाही. आता त्या खोटे सांगत आहेत. त्यांनी ब्राह्मण समाजाची क्षमा मागितली पाहिजे.