इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला की, भारतीय वायूदलाचे वैमानिक अभिनंदन यांना अटक केल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दूरभाष करून अभिनंदन यांना तात्काळ सोडण्यास आणि त्यांना भारतात परत पाठवून तणाव संपवण्यास सांगितले होते. चौधरी यांनी असाही दावा केला की, ट्रम्प यांनी या संकटासाठी भारताला उत्तरदायी ठरवले होते; परंतु वाद वाढवण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या ‘आज न्यूज’च्या कार्यक्रमात चौधरी बोलत होते.
१. वर्ष २०१९ मध्ये भारताने पाकमध्ये एअरस्ट्राइक केल्यानंतर पाकने भारतावर हवाई आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मिग लढाऊ विमानाद्वारे अभिनंदन यांनी पाकच्या लढाऊ विमानांचा पाठलाग केला होता. तेव्हा त्यांचे विमान पाकमध्ये कोसळले होते आणि नंतर पाकने त्यांना अटक केली होती.
२. चौधरी पुढे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी डोनाल्ड ट्रम्प यांचे मत फारसे चांगले नाही. ट्रम्प यांचा मोदी यांच्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन होता. त्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्या सोडवण्याची संधी होती; कारण इम्रान खान संबंध सुधारण्यासाठी सिद्ध होते. चांगले संबंध हे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांसाठी लाभदायी आहेत.
संपादकीय भूमिका‘अभिनंदन यांची सुटका न केल्यास पाकवर आक्रमण करू’, अशी भारताने धमकी दिल्यामुळेच पाकने त्यांची सुटका केली होती, हे सत्य चौधरी का सांगत नाहीत ? |