मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या झाली. त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा असूनही त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने सुरक्षा अधिकार्यांनी यासंदर्भात त्यांच्या अडचणी मांडल्या. सिद्दिकींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या ‘प्रोटेक्शन अँड सेक्युरिटी’ विभागाच्या बैठकीमध्ये या तक्रारींवर चर्चा झाली. विशेष महनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले अधिकारीही या वेळी उपस्थित होते. त्यांनी सुरक्षा पुरवतांना येणार्या अडचणी सांगितल्या. ‘विशेष महनीय व्यक्ती प्रवास करणार्या चारचाकीत बसू न देणे, अचानक प्रवासाच्या मार्गांमध्ये, ठिकाणांमध्ये पालट करणे किंवा नियोजन पालटणे असे प्रकार होतात. यामुळे सुरक्षा पुरवण्याचा मूळ उद्देशच अयशस्वी होतो’, असे अधिकार्याने सांगितले. काही वेळा सुरक्षा अधिकार्यांनी दिलेल्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केले जाते. वारंवार तक्रारी केल्यास संबंधित अधिकार्याचे स्थानांतर घडवून आणण्यात येते. ‘संबंधित व्यक्तीने सूचनांकडे दुर्लक्ष केले, तरीही त्यांच्या सुरक्षेलाच प्राधान्य द्यावे’, असे त्यांना सांगण्यात येते.
संपादकीय भूमिका :सुरक्षा अधिकार्यांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत ! |