जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !

सांगली, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात ‘जैन आर्थिक विकास महामंडळा’वर श्वेतांबर जैन समाजातील लोकांची सदस्य म्हणून राज्यशासनाने निवड केल्यानंतर ही निवड दिगंबर जैन समाजाला अमान्य आहे. श्वेतांबर जैन समाजातील ललित जैन यांची अध्यक्ष, मितेश नाहटा यांची उपाध्यक्ष, तर अरविंद शाह यांची सदस्यपदी निवड केल्यानंतर दिगंबर जैन समाजाने त्याला तीव्र विरोध केला आहे. राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निषेधाची पत्रे पाठवली जाणार आहेत, असे दिगंबर जैन समाजाचे बालब्रह्मचारी तात्याभैया नेजकर यांनी सांगितले, तसेच या निवडी आम्हाला अमान्य आहेत, असे ‘दक्षिण भारत जैन सभे’चे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी काही घंटे राज्यशासनाने जैन आर्थिक विकास महामंडळावरील निवडीची घोषणा केली. या समितीवर श्वेतांबर आणि दिगंबर जैन समाजातून कुणाला निवडले जाणार, यावरून चर्चा चालू झाली होती. प्रत्यक्षात ३ सदस्य श्वेतांबर समाजातील निवडले गेल्यानंतर आता वाद चालू झाला आहे. याविरोधात राज्यभर मोर्चा काढत असलेले बालब्रह्मचारी तात्याभैया नेजकर यांनी यावर तीव्र टीका केली आहे. आता आचारसंहिता असल्याने रस्त्यावर उतरता येणार नाही; मात्र दिगंबर जैन समाज सरकारच्या या कृतीचा हिशेब करील. आम्ही पत्रातून निषेध नोंदवू. दक्षिण भारत जैन सभेने या कृतीविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे.

भालचंद्र पाटील

जैन आर्थिक विकास महामंडळ काही विशिष्ट लोकांना पद देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे का ? जैन समाजातील मागासांच्या विकासाचा विचार व्यापारी करू शकणार नाहीत. इव्हेंट घेण्यापुरते हे महामंडळ उरेल. दक्षिण भारत जैन सभेला विचारात न घेता हा निर्णय झाला आहे. आम्हाला तो मान्य नाही. – भालचंद्र पाटील, अध्यक्ष, दक्षिण भारत जैन सभा