नागपूर येथे शाम मानव यांचा कार्यक्रम भाजप युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून बंद पाडण्‍याचा प्रयत्न  

अंधश्रद्धेशी सभेचा संबंध नसतांना शाम मानव यांनी काँग्रेसला समर्थन दिल्‍याने भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते संतप्‍त !

शाम मानव

नागपूर – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांच्‍या कार्यक्रमामध्‍ये भाजप युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांनी आक्रमक होऊन गोंधळ घातला. हे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने शाम मानव यांच्‍या कार्यक्रमात घुसले. ‘केवळ राजकारण केले जात आहे. राजकीय सूत्रे मांडून काँग्रेसला समर्थन देण्‍यासाठी ही सभा घेतली जात आहे. अंधश्रद्धेचा या सभेशी काहीही संबंध नाही’, असा आरोप त्‍यांनी केला. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्‍या वतीने ‘संविधान बचाव महाराष्‍ट्र बचाव’ या विषयावर येथील विनोबा विचार केंद्रात मानव यांचे व्‍याख्‍यान आयोजित केले होते.

१. शाम मानव व्‍यासपिठावर होते, तर व्‍यासपिठाखाली हे कार्यकर्ते गोंधळ घालत होते.

२. शाम मानव यांच्‍या भाषणाआधीच कार्यकर्त्‍यांनी गोंधळ घालत घोषणा दिल्‍या. पोलिसांनी मध्‍यस्‍थी करत त्‍यांना थांबवण्‍याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कार्यकर्त्‍यांना बाहेर काढण्‍याचा प्रयत्न केला.

३. शाम मानव यांचे भाषण ऐकण्‍यासाठी आलेल्‍या लोकांनी भाजप युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांना विरोध केला. त्‍यामुळे गोंधळ आणखी वाढला.

शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !

शाम मानव म्‍हणाले, ‘‘ज्‍या नागपूरमध्‍ये वेगवेगळ्‍या विचारधारेचे लोक एकत्र रहातात, जाहीरपणे एकाच व्‍यासपिठावरून वेगवेगळी मते मांडतात, त्‍याच नागपूरमधून राज्‍यघटना नष्‍ट होत आहे. तशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. मला या अशा गोष्‍टींची सवय आहे. या गोंधळानंतरही माझे भाषण १०० टक्‍के होणार आहे.’’ (शाम मानव यांच्‍यासारखे लोक राज्‍यघटना नष्‍ट होत असल्‍याच्‍या वल्‍गना करून समाजात एकप्रकारे ‘फेक नॅरेटिव्‍ह’ (खोटे कथानक) निर्माण करत आहेत ! – संपादक)