‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटीहून अधिक रकमेची वसुली

नवी मुंबई – महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटींहून रकमेची वसुली झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्र, तसेच मोरबे धरण ते कळंबोली मुख्य जलवाहिनी ज्या गावांतून जाते, त्या ग्रामस्थांना मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेद्वारे एकूण १ लाख ३८ सहस्र ६२ ग्राहकांना पाणीपुरवठा केला जातो. यांतील सहस्रो ग्राहक नियमितपणे पाणीदेयक भरून महापालिकेस सहकार्य करत असतात; मात्र काही ग्राहकांकडून विविध कारणांमुळे पाणीदेयक थकवले गेले आहे. अशा थकबाकीदार ग्राहकांकडून ५० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी येणे शिल्लक होती. यावर २१ कोटी ५९ लाख विलंब शुल्क आणि ९९ लाख ५९ सहस्र रुपये दंडात्मक रक्कम अशी मिळून ७३ कोटी ७३ लाख रुपये येणे बाकी होते.