थोडक्यात महत्त्वाचे

समीर वानखेडे निवडणूक लढवणार !

समीर वानखेडे

मुंबई – आंतरिक राजस्व सेवेचे (International Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. ते महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना धारावी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या आमदार होत्या; परंतु त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याने त्यांची जागा रिक्त आहे.


‘जलचर’ ॲप सिद्ध !

मुंबई – सागरी जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘बाँबे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी’ आणि महाराष्ट्र वन विभाग-कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सस्तन प्राणी, पक्षी यांच्या नोंदी अन् अभ्यासासाठी ‘जलचर’ हे भ्रमणभाषवरील ॲप्लिकेशन सिद्ध करण्यात आले आहे. या माध्यमातून सागरी जलचरांचे संवर्धन होणार आहे. हे ॲप मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये वापरता येईल. ही ॲप ‘गूगल प्ले स्टोअर’वरून विनामूल्य डाऊनलोड करता येईल.


चंद्रपूर येथे तरुणाची हत्या !

चंद्रपूर – एक महिन्यापूर्वी क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांत वाद झाला. त्यात एका तरुणाने मित्राचे डोके फोडले. याचा राग मनात घेऊन त्याने धारदार चाकूने मित्राची हत्या केली. (क्षुल्लक वादातून हत्येपर्यंत मजल गाठणारी तरुण पिढी गुन्हेगार होण्याकडे वाटचाल करत असल्याचेच दर्शक ! – संपादक) आर्यन आरेवार (वय १७ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आश्विन उपाख्य बंटी राजेश सलमवार, जॉन बोलीवार, जसीम नसीम खान, मोहन श्रीशेलम बेलमकुट्टी यांना अटक केली आहे.


मुलगा होऊनही मुलगी हातात दिली !

नाशिक – नाशिक जिल्हा रुग्णालयात मुलाला जन्म दिलेल्या महिलेच्या हातात मुलगी ठेवण्यात आली. रुग्णालयातून घरी सोडतांना हा प्रकार झाला. रुग्णालयाच्या नोंदवहीमध्ये मुलगा झाल्याची नोंद असतांनाही असा प्रकार घडल्याने महिलेच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करत बाळ घेण्यास नकार दिला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी संबंधितांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

संपादकीय भुमिका

नाशिक जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार !