|
नवी देहली – रेल्वे मंत्रालयाने तिकीटाच्या आरक्षणाच्या नियमात पालट करत आता ते १२० दिवसांआधी नव्हे, तर ६० दिवसांआधी (प्रवासाचा दिवस सोडून) मिळणार असल्याची माहिती दिली. हा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी आरक्षण केले आहे, त्यांच्या आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही. ज्या रेल्वेगाड्यांच्या तिकिटांच्या आरक्षणाचा कालावधी आधीपासूनच अल्प आहे, त्यांच्यावर या नियमाचा कुठलाही परिणाम होणार नाही. १२० दिवसांपूर्वी, म्हणजे ४ महिन्यांपूर्वी केलेले आरक्षण ऐनवेळी रहित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे अन्य प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेची हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.