नामजपाच्या मंडलाचे उपाय केल्यावर साधिकेला आणि समाजातील लोकांना झालेले लाभ !

१. नामजपाच्या मंडलाचे उपाय केल्याने समाजातील लोकांना सकारात्मक परिणाम जाणवणे आणि त्यामुळे त्यांची श्रद्धा वाढून त्यांच्या साधनेला आरंभ होणे

सौ. लता भट

‘अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या लक्षात आले, ‘या कलियुगात प्रत्येक कुटुंबात निरनिराळ्या अडचणी, संकटे आणि आध्यात्मिक त्रास आहेत.’ त्यांचे त्रास दूर होण्यासाठी मी त्यांना नामजप करायला सांगितला, तर त्यांचे ‘वेळच मिळत नाही’, असे उत्तर असते. मी त्यांना कोणकोणत्या वेळी, उदा. आपण जाता-येता, दैनंदिन कृती करतांना, प्रवास करतांना नामजप करू शकतो’, असे सांगितल्यावर त्यांना ते पटायचे. मी सतत त्यांच्या संपर्कात रहात असल्यामुळे ते त्यांच्या अडचणी किंवा समस्या मला सांगत असत. त्या समस्यांच्या निवारणासाठी मी त्यांना विविध आध्यात्मिक उपाय सांगत असे. त्यांतील एक म्हणजे ‘श्रीकृष्णाच्या नामजपाच्या मंडलात प्रार्थना लिहून घालणे.’ (टीप १) हा उपाय केल्यामुळे त्यांना सकारात्मक परिणाम मिळाले. त्यामुळे या उपायावरील त्यांची श्रद्धा वाढली. परिणामस्वरूप त्यांपैकी काही जणांनी ‘सनातन प्रभात’ नियतकांलिकासाठी विज्ञापने देणे, अर्पण देणे या माध्यमातून साधना करायला आरंभ केला.

२. ‘नामजपाच्या मंडलात प्रार्थना लिहून घालणे’, हे उपाय केल्यामुळे झालेल्या लाभांची काही उदाहरणे !

२ अ. साधिका आणि तिचे नातेवाईक यांना झालेले लाभ

२ अ १. नामजपाच्या मंडलाचे उपाय केल्यावर साधिकेच्या एका मुलाचे मद्यपानाचे व्यसन सुटणे आणि दुसर्‍या मुलाच्या नोकरीची अडचण सुटणे : माझ्या मुलाला मागील ३ – ४ वर्षांपासून मद्यपानाचे व्यसन होते. त्याचे हे व्यसन सुटावे, यासाठी मी श्रीकृष्णाच्या नामजपाच्या मंडलामध्ये त्याच्या या समस्येचे निवारण होण्यासंदर्भात प्रार्थना लिहिली. या आध्यात्मिक उपायामुळे त्याचे मद्यपानाचे व्यसन पूर्णपणे सुटले.

माझ्या दुसर्‍या मुलाला नोकरी मिळण्यात पुष्कळ अडथळे येत होते; पण या नामजपाच्या मंडलाच्या उपायाने त्याची प्रत्येक अडचण सुटत गेली.

२ अ २. नामजपाच्या मंडलाचे उपाय करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केल्यामुळे ५ – ६ दिवसांतच मनातील सर्व त्रासदायक विचारांवर मात करता येणे : अलीकडे मलाही बर्‍याच काळापर्यंत मानसिक त्रास होत होते. मी नामजप आणि सत्सेवा करत असतांना मला भूतकाळातील काही प्रसंग आठवायचे आणि त्याचा मला पुष्कळ त्रास होत होता. कधी-कधी तीव्र स्वरूपातील काळजीच्या विचारांमुळे मला अकारण पुष्कळ भीती वाटून मी अस्वस्थ होत असे. मी नामजपाच्या मंडलात सर्वकाही लिहून गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन केले. त्यानंतर ५ – ६ दिवसांतच मला सर्व त्रासदायक विचारांवर मात करता आली. माझ्या मानसिक स्थितीत आमूलाग्र पालट झाला. माझ्या मनात येणारे भूतकाळातील विचार पूर्णपणे थांबले. त्याबद्दल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ‘माझ्या सर्व अडचणी आणि मला होणारे त्रास हे केवळ मला ईश्वराच्या अधिक समीप जाण्यासाठी होते’, असे मला वाटले.

२ अ ३. प्रार्थना नामजपाच्या मंडलात लिहून घातल्यामुळे कार्यालयात त्रास देणारी व्यक्ती शांत होऊन चांगली वागू लागणे : माझ्या जवळच्या नातेवाइकांना मी नामजपाचे महत्त्व सांगत असे; परंतु ते नामजप करण्यास इच्छुक नसल्याचे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांना त्याबद्दल सांगणे बंद केले. काही नातेवाइकांना अनेक समस्या होत्या. माझ्या मेहुण्यांची एक ‘एजन्सी’ (विशिष्ट सेवा पुरवणारी संस्था) होती. तेथे एक व्यक्ती त्यांना त्रास देत असे. त्यामुळे ते स्वतःच्या कार्यालयात जायला घाबरायचे. त्यांना मी ‘नामजपाच्या मंडलात प्रार्थना लिहून घालणे’, हा उपाय सांगितला. त्यांनी त्याप्रमाणे केल्यावर २ – ३ आठवड्यांत ती त्रास देणारी व्यक्ती पुष्कळ शांत झाली अन् माझ्या मेहुण्यांशी चांगले वागू लागली. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक उपाय आणि ईश्वर यांवरील श्रद्धा वाढली. आता ते ‘सनातन प्रभात’चे वाचक बनले असून त्यांची साधना चालू आहे.

२ आ. समाजाला झालेले लाभ आणि त्यांच्यात झालेले परिवर्तन

२ आ १. मानसिक त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी केलेल्या इतर आध्यात्मिक उपायांच्या तुलनेत नामजपाच्या मंडलाच्या उपायाने त्वरित परिणाम मिळणे : इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे एक वाचक काही वर्षांपासून प्रचंड तणावात होते. ते स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार होते; परंतु ‘ती तिचा अभ्यासक्रम पूर्ण करील कि नाही ? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला योग्य नोकरी मिळेल कि नाही ?’, या विचारांमुळे ते त्रस्त होते. त्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते नामजप आणि इतरही आध्यात्मिक उपाय करत होते; मात्र त्या प्रयत्नांचा त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नव्हता. ‘समस्येच्या निवारणासाठी नामजपाच्या मंडलात प्रार्थना लिहिणे’, हा उपाय मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी तेही केले आणि त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम त्वरित दिसून आले. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. त्यामुळे त्यांची त्या उपायांवरील, पर्यायाने देवावरील श्रद्धा वाढली. त्या वेळेपासून ते त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय नियमितपणे करत आहेत.

२ आ २. नामजप करत कामे करायला आरंभ केल्यावर ती कामे शीघ्र गतीने आणि चांगली होत असल्यामुळे नामजप करायला अधिक वेळ मिळणे : माझ्या ओळखीचे दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वाचक आहेत. मी त्यांना नामजपाच्या महत्त्वाविषयी सांगायचे. तेव्हा ते मला म्हणायचे, ‘‘नामजप करायला वेळ मिळत नाही.’’ त्या वेळी मी त्यांना ‘सकाळी थोडा वेळ, संध्याकाळी थोडा वेळ, दैनंदिन कामे करतांना, असे किमान काही वेळ तरी नामजप कसा करता येईल’, असे सांगायचे. त्यानुसार त्यांनी हळूहळू नामजप करायला आरंभ केला. तेव्हा नामजप करत कामे केल्याने ती कामे चांगली आणि शीघ्र गतीने पूर्ण होत असल्यामुळे त्यांना नामजप करायला आणखी वेळ मिळू लागला. ‘गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) सर्वांना साधनेत आणतात आणि त्यांच्याकडून सर्वकाही करवून घेतात ?’, हे खरोखर विस्मयकारक आहे.

२ आ ३. नामजपाच्या मंडलात प्रार्थना लिहिल्याने विदेशात असलेल्या मुलाच्या ‘व्हिसा’संबंधीच्या अडचणी सुटणे : त्या वाचकाचा मुलगा विदेशात गेला होता. तेथे त्याला तेथील ‘व्हिसा’संबंधी (प्रवेश परवान्यावर अनुमतीचा शिक्का मिळवण्यासंबंधी) काही अडचणी आल्या. मी त्यांना ‘समस्येच्या निवारणासाठी प्रार्थना नामजपाच्या मंडलात लिहिणे’, हा आध्यात्मिक उपाय करायला सांगितला. त्यांनी ते उपाय केल्यामुळे एका मासातच त्या मुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उपायांवरील श्रद्धा आणखी वाढली. त्यानंतर ‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत त्या वाचकांनी ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकायला आरंभ केला. त्या सत्संगांचा त्यांना पुष्कळ लाभ झाला. आता ते नामजपाच्या समवेत सेवाही करू लागले आहेत.

२ आ ४. नामजपाच्या मंडलाचा उपाय केल्याने मनःस्थितीत सकारात्मक पालट होऊन हलकेपणा जाणवणे : ‘सनातन प्रभात’चे एक वाचक आहेत. काही वर्षांपूर्वी एका मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगांना ते वाचक जात होते. त्या वेळी ते लहान होते; परंतु तेव्हापासून ते नामस्मरण करत आहेत. त्यांच्या व्यावहारिक जीवनात अनेक चढ-उतार होते. एकदा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयातील अडचणी सांगितल्या. त्या वेळी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी त्यांना नामजपाच्या मंडलाचा उपाय करायला सांगितला. त्यांनी तसे केल्यावर केवळ २ सप्ताहांत त्यांच्या मनःस्थितीत सकारात्मक पालट झाला. त्यांनी ‘मला पुष्कळ हलकेपणा जाणवत आहे’, असे मला सांगितले. अखिल मानवजातीसाठी हा आध्यात्मिक उपाय देऊन त्यांना साधना आणि सेवा यांत सहभागी करून घेण्यार्‍या गुरुदेवांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘हे गुरुदेवा, या उपायाद्वारे तुम्ही आम्हा सर्वांचे जीवन सुसह्य करत आहात. हे गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतलीत. त्यासाठी मी तुमच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत साधनारत आणि सेवारत रहाता येऊ दे, अशी तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– सौ. लता भट (वय ६२ वर्षे), अंधेरी, मुंबई. (१.६.२०२३)

  • टीप १ – एका कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल काढून नंतर त्यामध्ये समस्येच्या निवारणासाठी प्रार्थना लिहावी. असे केल्याने समस्येचे निवारण होते.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक