संपादकीय : अमेरिकेतील असमतोल !

अमेरिका म्हणजे बलाढ्य आणि तितकेच विकसित राष्ट्र ! जगातील सर्वांत मोठा औषधांचा बाजारही याच अमेरिकेत आहे; पण दुर्दैवाने आज तेथे औषधांचा तुटवडा भासत आहे. सर्वच क्षेत्रांत अग्रेसर असणार्‍या आणि प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणार्‍या एखाद्या राष्ट्राच्या संदर्भात असे घडणे खरेतर लाजिरवाणेच आहे; पण हे वास्तव आहे. मोठमोठे आजार आणि त्यावरील उपचारपध्दतीची औषधेही अमेरिकेत मिळत नाहीत. अमेरिकेतील ही स्थिती धोकादायक आणि तितकीच चिंताजनकही आहे; म्हणूनच हा विषय सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर गाजत आहे. या विषयाकडे भारताने मोठी संधी म्हणून पहायला हवे; कारण अमेरिकेतील औषधनिर्मिती उद्योग हा प्रामुख्याने भारत आणि चीन येथून आयात केल्या जाणार्‍या औषधनिर्मितीच्या घटकांवर अवलंबून आहे. प्राप्त परिस्थिती लक्षात घेता भारताने या संधीचा लाभ घेऊन या क्षेत्रात भरीव वाटचाल करायला हवी. यासाठी अमेरिकेतील औषध आस्थापनांना डच्चू देऊन आपले प्रस्थ निर्माण करावे लागेल. भारतात औषध उत्पादनांची निर्मिती वाढवल्यास आपणही अमेरिकेला तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतो. त्यातून भारताचीच व्यापारवृद्धी साधली जाईल ! सध्याच्या स्थितीला काही नावाजलेली औषध आस्थापने देशाबाहेर चांगली कमाई करत आहेत. भारताने वरील पाऊल उचलल्यास त्यात अधिक भर पडेल.

भारत आता अनेक क्षेत्रांत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. शस्त्रास्त्रांच्या उत्पादनांत तर भारत आत्मनिर्भर होत आहे. औषधांच्या उत्पादनांमध्येही अशीच कामगिरी बजावल्यास जगातील सर्वांत मोठा औषधांचा बाजार म्हणून नावाजलेल्या अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.

अमेरिकेतील वैद्यकीय अस्थिरता !

बाजारात औषधांच्या किमती वाढू लागल्या. साहजिकच याचा त्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला. रशिया-युक्रेन येथील भयावह स्थितीमुळे औषधांची पुरवठा साखळी मंदावू लागली. नवीन औषधे निर्माण करायची, तर त्यासाठी लागणारा प्रशासकीय परवाना घेण्याची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची असते. त्यामुळे त्या प्रक्रियेत शिरणे कुणासाठीही अवघडच ठरेल. औषधनिर्मितीसाठी अमेरिकेत प्रोत्साहनही दिले जात नाही. एकूणच काय, तर उत्पादने अल्प पडणे आणि वरील समस्या यांमुळे सरतेशेवटी औषध आस्थापनांनी त्यांची उत्पादने हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेतला. औषधच मिळणार नसेल, तर कुणाचाही जीव टांगणीला लागेल. त्यामुळे अर्थातच नागरिकांनी आपापल्या घरात औषधांचा साठा केला. केविलवाणी जनता अजून काय करणार ? खरेतर प्रशासनानेच जनतेवर अशी वेळ यायला नको याची काळजी घेणे अपेक्षित होते. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास घरच्या घरी औषधे उपलब्ध होतील; पण हा साठा किती काळ घरात करून ठेवणार ? कारण यातून औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

 

अमेरिकेत केवळ औषधेच नव्हे, तर आधुनिक वैद्यांचाही तुटवडा आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांतही याचा परिणाम दिसून येतो. आधुनिक वैद्यच उपलब्ध नसल्याने एखाद्या आजाराच्या संदर्भात नावनोंदणी करायची असेल, तर त्यासाठी १ महिना अगोदर नोंदणी करावी लागते. १ महिन्याने संबंधित रुग्णाचा क्रमांक येतो. अपुर्‍या आधुनिक वैद्यांमुळे चिकित्सालये, रुग्णालये येथे रुग्णांच्या भल्या मोठ्या रांगा दिसून येतात. काही वेळा तर एखादा रुग्ण गंभीर किंवा अत्यवस्थ झाला, तर त्यालाही वेळेतच उपचार मिळत नाहीत. थोडक्यात काय तर अमेरिकेतील आरोग्य व्यवस्थाच ढेपाळलेली आहे, हे दिसून येते.

देशातील सर्वच ठिकाणचे आरोग्य विभाग सक्षमतेने कार्यरत असणे, आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्येवर पूर्ण क्षमतेने मात केली जाणे, वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन उपचारपद्धती विकसित होणे, हे साध्य झाल्यासच नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहू शकते. यामुळेच व्यक्ती निरोगी आणि निकोप जीवन जगू शकते. प्रत्येकाचे आरोग्यस्वास्थ्य चांगले असणे, हा देशाचा अप्रत्यक्ष पायाच आहे; पण अमेरिकेच्या संदर्भात तो डळमळीत झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात अनेक संकटे अमेरिकेसमोर ‘आ’वासून उभी आहेत. अमेरिकेसारख्या देशात वैद्यकीय स्तरावर अशी आणीबाणी निर्माण होणे उचित नाही. अमेरिका सर्वच स्तरांवर स्वतःला सक्षम म्हणून मिरवते; पण वैद्यकीय क्षेत्रात औषधांच्या दृष्टीने तिच्या सक्षमतेलाही मर्यादा असल्याचे दिसून येते. अनेक भारतियांना ‘अमेरिकेत जावे, तेथे स्थायिक व्हावे, भारतापेक्षा अमेरिका श्रेष्ठ आहे’, असे वाटत असते; पण वरील स्वरूपात मांडलेल्या घटना पहाता भारत किती श्रेष्ठ आहे, याचा सखोल विचार केला, तरच त्यातून अमेरिकेचे खरे स्वरूप उघड होईल. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या, श्रीमंतीचा लखलखाट दाखवला की, आपला बडेजाव मिरवता येतो; मात्र आरोग्य क्षेत्रात निर्माण झालेला पोकळपणा अमेरिकेचे वास्तव जगासमोर आणल्यावाचून रहात नाही. औषधनिर्मितीत भारताने पुढाकार घेतला, तर वैद्यकीयदृष्ट्या कमकुवत असलेल्या अमेरिकेला भारतावर अवलंबून रहाण्यावाचून पर्यायच उरणार नाही !

म्हणे अमेरिका विकसित !

अमेरिका स्वतःला विकसित म्हणवून घेत असली, तरी त्या विकासाचा अर्ध्याहून अधिक पाया हा भारतियांवरच अवलंबून आहे; कारण भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या बुद्धीवान भारतियांमुळेच अमेरिकेत भरभराट झाली आहे, असे तेथील स्थानिक नागरिकच सांगतात. मग असे असतांना स्वतःचे श्रेष्ठत्व गाजवणे हे अयोग्य नव्हे का ? कोरोना महामारीच्या कालावधीत भारताने अनेक देशांना लसींचा पुरवठा केला आणि आंतरराष्ट्रीय विश्वात ‘मानवतावादी’ म्हणून स्थान प्राप्त केले. त्याच कालावधीत ‘रेमडेसिविर’ या इंजेक्शनचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत होता; मात्र हे इंजेक्शन स्वतःच्या देशात उत्पादित होत असतांनाही अमेरिकेने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यातूनच अमेरिकेची स्वार्थी मनोवृत्ती दिसून येते. अमेरिकेमध्ये श्रीमंती, विकास, वैज्ञानिक प्रगती साध्य झाली असली, तरी आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय या क्षेत्रांमध्ये तेथील व्यवस्थेला अद्याप समतोल साधता आलेला नाही. यामुळे तेथील नागरिक असमाधानी आहेत. अमेरिकेने ही सद्य:स्थिती लक्षात घ्यावी. विकासाचा ढोल बडवणार्‍या अमेरिकेचे खरे रूप ओळखून भारताने योग्य तो बोध घ्यावा आणि वाटचाल करावी, हेच उचित ठरेल !

औषधांशी संबंधित निर्माण झालेली आणीबाणी विकासाचा ढोल बडवणार्‍या अमेरिकेचा फोल कारभार दर्शविते !