पंढरपूर – श्री विठ्ठल मंदिरात हनुमान द्वाराजवळ काम चालू असतांना ३० मेच्या रात्री २ वाजता एक तळघर आढळले. हे तळघर ६ फूट लांब आणि ६ फूट रूंद आहे. ३१ मे या दिवशी पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि वारकरी यांच्या उपस्थितीत या तळघराची पहाणी करण्यात आली. या खोलीत अनेक मूर्ती असल्याचे निदर्शनास आले.
या खोलीत एक देवीची साडेतीन फूट उंचीची मूर्ती, तसेच अन्य मूर्ती सापडल्या आहेत. देवीची मूर्ती १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मूर्तींसह या तळघरात काही नाणीही सापडली आहेत. या सर्व सापडलेल्या मूर्ती आणि नाणी यांवर पुढील संशोधन करण्यात येणार आहे.