संपादकीय : ससून : गुन्हेगारांचे आश्रयस्थान ?

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक झाली आहे. यांतील सगळ्यात धक्कादायक अटक म्हणजे आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे खोटे नमुने देणारे ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हळनोर यांची होय ! या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाने मद्यपान करून गाडी चालवल्याचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरणार्‍या गोष्टीशी सरकारी आधुनिक वैद्यांकडून छेडछाड होणे, म्हणजे ‘कुंपणानेच शेत’ खाल्ल्याचा प्रकार आहे. या अगोदर अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने याच रुग्णालयात आजारपणाचे खोटे प्रमाणपत्र देऊन दीर्घकाळ वास्तव्य केले. यानंतर तो याच रुग्णालयातून पळून जाण्यास यशस्वी झाला होता. उंदराच्या चाव्याने रुग्णाचा मृत्यू, मूत्रपिंड प्रत्यारोपणात मूत्रपिंडच गायब झाल्याचे आरोप यांसह विविध आरोपांमुळे १६० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारे पुण्यातील ससून हे शासकीय रुग्णालय रुग्णांसाठी आधारस्तंभ न ठरता गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत आहे, असेच म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे.

ललित पाटील

ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे जाळे चालवणारा मुख्य आरोपी ललित पाटील याचा मुक्काम वाढवण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अध्यक्षांना पत्र दिले होते. ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्यपान केले आणि काही मद्यधुंद डॉक्टरांनी गोंधळ घालून निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थिनीने ‘रॅगिंग’ची तक्रार केली होती. हे प्रकरणही पुढे दडपण्यात आले. ही केवळ काही समोर आलेली प्रकरणे असून गेल्या काही वर्षांपासून घडत असलेल्या या प्रकरणांमुळे ससून रुग्णालय कलंकित झाले आहे. जोपर्यंत यातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत ससूनची प्रतिमा उजळणे कठीण आहे. वास्तविक ‘एका शासकीय रुग्णालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालू असतांना सरकारी यंत्रणा काय करत होती ?’, हाही एक अनुत्तरित प्रश्न आहे.

डॉ. तावरे यांचे विविध कारनामे !

‘फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सॉलॉजी’ विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. डॉ. तावरे यांची संपूर्ण कारकीर्दच संशयाच्या भोवर्‍यात आहे. डॉ. तावरे हे वर्ष २००७ मध्ये ससूनमध्ये रूजू झाले असून गेली १७ वर्षे ते याच रुग्णालयात ठाण मांडून आहेत. मध्यंतरी त्यांचे अन्य ठिकाणी स्थानांतर झाले; मात्र राजकीय शक्तींच्या पाठिंब्याने ते ससूनमध्ये परत आले. डॉ. अजय तावरे अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर असतांना वर्ष २०२२ मध्ये मूत्रपिंड तस्करीचा आरोप झाल्यावर त्यांना अधीक्षक पदावरून हटवण्यात आले. यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची परत एकदा अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

यांच्याच कार्यकाळात ससूनमध्ये अतीदक्षता विभागात एका रुग्णाला उंदीर चावून तो मृत्यूमुखी पडल्याचे प्रकरण घडले; अर्थात् त्यावर पुढे ठोस कारवाई काहीच झाली नाही. वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी चालू केल्यावर राजकीय संधान साधून आणि गैरमार्गाने कशा प्रकारे अधीक्षकपदापर्यंत जाता येते, त्या भ्रष्ट व्यवस्थेचा आणि कारभाराचा नमुना म्हणजे डॉ. अजय तावरे होय ! आरोपीचे पिता विशाल अग्रवाल यांच्या सोबतच्या संभाषणाचे पुरावे राहू नयेत; म्हणून डॉ. अजय हे ‘व्हॉट्सॲप’वरून दूरभाष करत असत, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. यावरून एखाद्या सराईत गुन्हेगारालाही मागे टाकेल अशी वर्तणूक डॉ. अजय तावरे यांची होती; मात्र गेल्या १७ वर्षांत त्यांच्यावर एकदाही कारवाई होऊ नये, यासाठी त्यांच्यामागे निश्चितच राजकीय शक्ती असणार. त्याचाही भांडाफोड होण्याची आवश्यकता या निमित्ताने आहे. एका शासकीय रुग्णालयात उच्चपदावर असणारे डॉक्टर असे असतील, तर तेथील कामकाज कसे असेल आणि त्याहून पुढे जाऊन सामान्य रुग्णांना कशी वागणूक दिली जात असेल, याचा विचारही न केलेला बरा !

डॉ. तावरे हे केवळ शासकीय सेवेत अनियमित आणि भ्रष्ट कारभार करत होते असे नाही, तर ते पुण्यात ज्या सोसायटीत रहात होते, त्या सोसायटीचे अध्यक्षपद भूषवत असतांनाही त्यांनी गैरकारभार केला. गेल्या वर्षभरात त्यांनी अध्यक्षपद भूषवतांना अन्य सदस्यांना काम करू दिले नाही, वार्षिक हिशोब दिला नाही. ‘त्यांना कुणी जाब विचारल्यास ते अरेरावीची भाषा करत असत’, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. ‘डॉ. तावरे यांना अटक झाल्यामुळे आमच्या सोसायटीची अपकीर्ती झाली. त्यामुळे आम्ही व्यथित झालो’, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ. अजय तावरे यांची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, अशी स्वीकृती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी दिली आहे. त्याही अगोदर डॉ. तावरे यांना अधीक्षक करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. म्हणजे या प्रकरणी थेट राजकीय हस्तक्षेप झाला असे म्हणण्यास वाव आहे.

सर्वच अनियमिततांची पडताळणी करा !

जेव्हा एखादी मोठी दुर्घटना घडते, तेव्हाच सर्व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकदम खडबडून जागे होतात आणि मग तात्काळ सगळे ‘ॲक्शन मोड’मध्ये येतात. वास्तविक ससूनमधील एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. अजय तावरे यांना चौकशी समितीने दोषी ठरवले होते. त्यामुळे मार्चपासून ते अधीक्षपदावर नव्हते. असे असतांनाही त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले आणि त्यात पालटही केला !  याचा अर्थ इतका सगळा अनागोंदी कारभार होत असतांना त्याकडे कुणाचेच कसे काय लक्ष नव्हते ? ससूनसारखी रुग्णालये ही मुख्यत्वेकरून सामान्य रुग्णांसाठी आशेचे किरण असतात. तीच रुग्णालये आणि त्यातील आधुनिक वैद्य जर त्यांच्या पदांचा उपयोग श्रीमंतांना वाचवण्यासाठी करत असतील, तर सामान्यांचा अशा रुग्णालयांवरील विश्वासच उडून जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणातील प्रत्येक दोषीला िशक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याही पुढे जाऊन या रुग्णालयात अन्य काही अनियमितता आहेत का ? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ससूनची गमावलेली प्रतिष्ठा काही प्रमाणात परत मिळेल !

आपल्या अधिकारांचा गैरवापर करून खोटे अहवाल देणार्‍या आधुनिक वैद्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा हवी !