सणांद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञ रहायला शिकवणारा हिंदु धर्म !

नागपंचमी

श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो. जगातील सर्व जीवजंतू जगाच्या कार्यासाठी पूरक आहेत. नागपंचमीला नागांच्या पूजेद्वारे ‘भगवंत त्यांच्याद्वारे कार्य करत आहे’, हा विशाल दृष्टीकोन हिंदु धर्माने लोकांना दिला आहे.

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. ‘वटसावित्रीची पूजा म्हणजे ‘सावित्रीच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा’; म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे.’ वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असते. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे.

गुडीपाडवा

पाडव्याच्या आसपासच वसंत ऋतू चालू होतो. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. निसर्गाच्या या सुखद परिवर्तनाच्या वेळी हिंदू नवे वर्ष साजरे करतात. निसर्गाने प्रदान केलेल्या  गोष्टींमधूनच गुढी उभारून ईश्वरी तत्त्व सहजरित्या ग्रहण करता येते.

घटस्थापना

आश्विन शुक्ल प्रतिपदा या तिथीला घटस्थापना केली जाते. यात मातीची वेदी सिद्ध केली जाते. त्यावर पाण्याचा घडा ठेवून त्यावर देवीची स्थापना करून पूजा केली जाते. घटस्थापना करतांना मातीत सप्तधान्ये घातली जातात. निसर्गाने दिलेली माती, पाणी, धान्य यांद्वारे देवीची पूजा केली जाते. दसर्‍याच्या दिवशी उगवलेले रोप देवाला अर्पण करण्याची पद्धतही आहे.

पोळा

पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी जे प्राणीमात्र आपल्या कष्टाने मानवाच्या जीवनाला आधारभूत झालेले आहेत, त्यांची पूजा आणि स्मरण केले जाते. या उत्सवाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकर्‍यांमध्ये या उत्सवाला फार महत्त्व आहे.

नारळी पौर्णिमा

पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखण्यात सूर्य, नद्या आणि समुद्र यांचा मोलाचा वाटा आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. नियमितपणे पाऊस पडण्यात सूर्यासह समुद्रदेवाचेही मोलाचे योगदान आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या पूजनाने वरुणदेवाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मातील पर्यावरणपूरक म्हणजे ‘इकोफ्रेंडली’ सण-उत्सवांना विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी ढोंगीच !