दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ७८ वर्षीय महिलेवर शेतशिवारात बलात्कार !; १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची शक्यता !…

७८ वर्षीय महिलेवर शेतशिवारात बलात्कार !

अकोला – येथील ७८ वर्षीय महिलेवर तिघांनी शेतशिवारात बलात्कार केला असून तिघे जणही फरार आहेत. आरोपींचे वय साधारण ३० ते ३५ वर्षे आहे. अज्ञात आरोपींचा अकोला पोलिसांकडून शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका : विकृतीने गाठली परिसीमा !


१० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची शक्यता !

मुंबई – येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाला प्रारंभ होणार असून १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पावसाळ्यापूर्वी सागरी किनारा प्रकल्पांतील बोगद्यांना गळती !

मुख्यमंत्र्यांनी केली पहाणी !

मुंबई – महानगरपालिका प्रशासनाच्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्यांत पाणी झिरपत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पहाणी करून यंत्रणांना तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या, तसेच दुरुस्तीच्या कामांच्या वेळी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी १४ सहस्र कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.


डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करा ! – शिवसेना

मुंबई – जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले, हा संपूर्ण देशाचा अवमान आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, अशी अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. एकीकडे ‘जय भीम’ म्हणायचे आणि दुसरीकडे असे कृत्य करायचे. या कृत्यानंतर क्षमायाचना म्हणजे नाटक आहे. आव्हाड यांची क्षमायाचना हे मगरीचे अश्रू आहेत, असे राजू वाघमारे यांनी म्हटले.


अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध !

मुंबई – जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले. त्यांच्याकडून झालेल्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.

आंधळेपणाने कोणतेही आंदोलन होत नाही आणि मनुस्मृति जाळल्याने ती मरत नाही, तर कृती केल्याने मनुस्मृति संपेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.


आव्हाड यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन !

नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भित्तीपत्रक फाडणार्‍या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस नाशिकमध्ये युवासेनेच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी युवासेना विस्तारक योगेश बेलदार, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, भिवानंद काळे, सनी रोकडे, मिलिंद मोरे यांसह अन्य उपस्थित होते.