स्वातंत्र्यवीर सावरकर हे अजरामर व्यक्तीमत्त्व ! – आनंद कुलकर्णी, ज्येष्ठ नेते हिंदु महासभा

सातारा, २९ मे (वार्ता.) – प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, कवी, साहित्यिक, प्रखर क्रांतीकारी, क्रांतीकारकांचे मुकुटमणी, द्रष्टा राज्यकर्ता, प्रखर राष्ट्रभक्त अशा एक ना अनेक भूमिका वठवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अजरामर व्यक्तीमत्त्व आहे, असे प्रतिपादन जयसिंगपूर येथील अखिल भारत हिंदु महासभेचे ज्येष्ठ नेते आनंदजी कुलकर्णी यांनी केले.

येथील राजवाडा परिसरातील महिला मंडळाच्या सभागृहात अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. या संमेलनामध्ये ते उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथजी शिंदे, हिंदु महासभेचे प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, समन्वयक कार्यवाह, संजयजी कुलकर्णी, सातारा जिल्हाध्यक्ष धनराजजी जगताप, नीलेशजी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आनंदजी कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रत्येक साहित्यातून राष्ट्रभक्तीचा हुंकार अनुभवास येतो. समाजाला योग्य दिशा मिळते. या साहित्याची पारायणे झाली पाहिजेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. आता त्याप्रमाणे आपल्यालाही देव, देश अन् धर्म यांसाठी प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करत प्रत्यक्ष कृती आराखडा सिद्ध केला पाहिजे. तरच आपण स्वातंत्र्यवीरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकू !

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे आणि ‘स्वा. सावरकर विचार मंच’चे श्री. मोहन साठे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कला, क्रीडा, चित्रपट, नाटक, सामाजिक, न्याय, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. वन्दे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनराज जगताप यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. उमेश गांधी यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी घेतला.