साधिकेने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यावर तिचे झालेले चिंतन अन् तिला झालेला लाभ !

श्रीमती रजनी नगरकर

१. ‘अपेक्षा करणे’, हा साधनेतील मोठा अडथळा असणे, त्या संदर्भात मनाला दृष्टीकोन दिल्यावर आणि स्वयंसूचना सत्रे केल्यावर अपेक्षा करत असल्याची मनाला जाणीव होणे अन् त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे

‘अपेक्षा करणे’ हा साधनेतील मोठा अडथळा आहे. आपली अपेक्षा पूर्ण झाली की, आपले मन सुखावते. ‘मी चांगले प्रयत्न करते’, अशी आपली अयोग्य विचारप्रक्रिया होते. आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही की, आपले मन दुखावले जाते. आपली चिडचिड होते. ‘अपेक्षा करणे’ साधनेत येत नाही, तरीही मी त्यात अडकत होते. मी त्या संदर्भात मनाला दृष्टीकोन देत होते आणि स्वयंसूचना सत्रे करत होते. माझ्याकडून अपेक्षा होताच मला त्याची जाणीव होत असे आणि मी मनाला फटकारण्याचा प्रयत्न करत असे. माझे ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर मात करण्याचे थोडेसे प्रयत्न झाले, तरीही मी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते. ‘माझे मन ते सगळे स्वीकारून आणि मी स्वयंसूचना दिल्याने प्रयत्नरत होत आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रयत्न वाढवत होते. देवाने माझ्याकडून हे प्रयत्न करून घेतले.

२. जाणवलेले पालट

२ अ. पूर्वी मनातील विचारांविषयी सांगतांना ‘मला समजून घ्यावे’, हा विचार तीव्र असणे आणि आता प्रसंग घडल्यास मनाला योग्य दृष्टीकोन दिल्याने स्वतःकडून चूक सहजतेने सांगितली जाणे : पूर्वी मला मनातील विचार मोकळेपणाने सांगता येत नव्हते. मी माझ्या मनातील विचार काही वेळा सांगितले, तरीही माझ्याकडून ते गार्‍हाणे केल्याच्या सुरात आणि ‘मी कशी योग्य आहे’, अशा प्रकारे सांगितले जात असत. मला एखादा प्रसंग सांगतांना रडू येत असे. मी प्रसंगाविषयी शांतपणे सांगू शकत नसे. त्या वेळी माझ्या मनात ‘मला समजून घ्यावे’, हा विचार तीव्र असे.

आता प्रसंग घडल्यास मी मनाला दृष्टीकोन देते. माझ्या मनात ‘मी कुठे न्यून पडले ? माझे काय चुकले ? मी काय करणे देवाला अपेक्षित होते ?’, असे विचार चालू होतात. देवाने मला मनाचे निरीक्षण करायला शिकवले. आता मी आधी माझ्याकडून झालेली चूक सांगते आणि नंतर ‘त्या प्रसंगात काय घडले ?’, याविषयी सांगते. मला सहजतेने आणि मोकळेपणाने सांगता येते.

२ आ. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘अनावश्यक बोलणे होते आणि बोलण्यात द्विरूक्ती असते’, असे सांगितल्यावर मनाचा संघर्ष होणे, नंतर बोलण्यातील चुका शोधून त्या टाळण्यासाठी प्रयत्न केल्यावर काही प्रमाणात अनावश्यक बोलणे न्यून होणे : मला अनेक वेळा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात (टीप) आढावासेविका आणि सहसाधक यांनी सांगितले, ‘‘तुमचे अनावश्यक बोलणे होते आणि तुमच्या बोलण्यात द्विरूक्ती असते.’’ मी सहसाधकांना माझ्या बोलण्यातील स्वभावदोषांविषयी विचारणे, स्वयंसूचना सत्रे करणे, असे प्रयत्न केले, तरीही माझ्याकडून बोलतांना चुका होत होत्या. त्या वेळी माझ्या मनाचा संघर्ष होत असे आणि ‘सहसाधकांच्या बोलण्यातही द्विरूक्ती असते’, असे मला वाटत असे.

नंतर देवाने सुचवल्याप्रमाणे मी ‘बोलण्यातील चुका कुठे होतात ?’, त्या संदर्भातील ७ – ८ वाक्ये लिहून ठेवली. मी प्रतिदिन ती वाक्ये ३ – ४ वेळा वाचते आणि मनावर लक्ष ठेवणे, चुका विचारणे’, असे प्रयत्न करते. आता काही प्रमाणात माझे अनावश्यक बोलणे न्यून झाले आहे.

(टीप : साधक करत असलेला नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न, तसेच स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, या सूत्रांविषयी जाणून घेणे आणि साधकांना त्या संदर्भात दिशा देणे.)

२ इ. साधकाचे स्वभावदोष लक्षात आल्यास मनात पुष्कळ प्रतिक्रिया येणे आणि साधकामधील गुण आठवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यावर मात करता येणे : पूर्वी साधकाचे स्वभावदोष लक्षात आल्यास मला पुष्कळ प्रतिक्रिया येत असत. मला त्यावर मात करता येत नव्हती. एखादा साधक दिसल्यावर माझ्या मनात ‘तो असाच आहे आणि तो तसाच आहे’, असा विचार येत असे. त्यानंतर ‘एखादा साधक दिसल्यावर मी त्या साधकाचा एक तरी गुण आठवण्याचा प्रयत्न करायचा’, असे ठरवल्यावर मला त्यावर मात करता येणे शक्य झाले. आता प्रसंग घडताच ‘मनात काय विचार आहेत ? मी किती वेळ त्या प्रसंगात अडकते’, यांवर लक्ष ठेवणे चालू केले. आता त्यावर गुरुकृपेने बर्‍या प्रमाणात प्रयत्न करता येत आहेत.

२ ई. पूर्वी बोलण्यात, कृतीत किंवा विचारात चूक झाल्यासही ‘स्वतःचे योग्यच आहे’, असे वाटणे आणि आता चूक झाल्यास क्षमा मागण्याचा प्रयत्न करणे अन् ‘हे सर्व साधना होण्यासाठी करायचे आहे’, हे मनावर बिंबवणे : पूर्वी माझी बोलण्यात, कृतीत किंवा विचारात काही चूक झाल्यास माझ्या मनात ‘मीच योग्य केले, असेच करायला हवे, समोरचा कसा चुकला, तो नेहमीच चुकतो आणि गार्‍हाणे करतो’, असे विचार असत. ‘मी क्षमायाचना करणे’, ही दूरची गोष्ट होती. आता माझ्याकडून चूक झाल्यास मी क्षमा मागण्याचा प्रयत्न करते. तेव्हा माझ्या मनात ‘माझे योग्य आहे’, असा विचार असला, तरी देवच मला शांत ठेवतो. ‘आपले मन शांत ठेवण्यासाठी आणि साधनारत रहाण्यासाठीच’, हे सर्व करायचे’, हेही मी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करते.

२ उ. पूर्वी स्वतःकडून चूक झाल्यास साधकाची क्षमा मागितली, तरीही मनात तो प्रसंग बराच वेळ असणे आणि आता त्या साधकाशी सहजतेने बोलण्याचा प्रयत्न केल्यावर सकारात्मक रहाता येणे : पूर्वी माझ्याकडून चूक झाल्यास मी साधकाची क्षमा मागितली, तरीही माझ्या मनात तो प्रसंग बराच वेळ असतो. आता देवाने सुचवल्यानुसार मी त्या साधकाशी स्वतःहून हसते, बोलते आणि त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करते. त्या साधकाच्या मनात काहीही असले, तरीही माझे मन सकारात्मक रहाते. देव मला साहाय्य करत आहे; याबद्दल मला देवाप्रती कृतज्ञता वाटते.

२ ऊ. ‘एखाद्या प्रसंगाविषयी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगू नये’, असे वाटणे; मात्र स्वतःकडून नकळत त्या प्रसंगाविषयी सांगितले जाणे आणि सूक्ष्मातून देवाचे अनमोल साहाय्य लाभणे : मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगायची सूत्रे लिहून ठेवते. मला काही वेळा ‘एखादा प्रसंग आढाव्यात सांगू नये’, असे वाटते. तेव्हा मी त्या प्रसंगाविषयी लिहून ठेवत नाही, तरीही माझ्याकडून आढाव्यात त्या प्रसंगाविषयी सांगितले जाते. भगवंतच माझ्या नकळत माझ्याकडून त्याविषयी सांगून घेतो. नंतर माझे मन शांत होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून देवाचे अनमोल साहाय्य लाभते.

देवा, ‘तू माझे साधनेचे प्रयत्न वाढवून मला तुझ्या चरणांशी घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. गुरुमाऊली, कृतज्ञता ! इदं न मम ।’ (अर्थ : हे लिखाण माझे नाही.)

– रजनी नगरकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.