अपप्रचार खोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा कृतीशील प्रसार करणे हाच पर्याय ! – अजय तेलंग, सावरकर साहित्याचे अभ्यासक

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. अजय तेलंग आणि व्यासपिठावर उपस्थित श्री. प्रदीप शिरगुरकर

मिरज (जिल्हा सांगली), २९ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेला सशस्त्र क्रांतीकारी लढा, त्यांनी निर्माण केलेले उत्तुंग साहित्य, तसेच राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांत केलेले कार्य हे आपण समजू शकलो नाही. त्यामुळेच सावरकर स्वीकारले गेले नाहीत. आजही त्यांच्याविषयी हेतूपुरस्सर अपप्रचार केला जात आहे. अपप्रचार खोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा कृतीशील प्रसार करणे, हाच पर्याय आहे, असे प्रतिपादन सावरकर साहित्याचे अभ्यासक श्री. अजय तेलंग यांनी येथे केले. ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सांस्कृतिक मंडळा’च्या वतीने सावरकर जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी येथील ज्युबिली कन्या शाळेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक कार्य’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सावरकर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदीप शिरगुरकर, सर्वश्री राजाभाऊ शिंदे, मोहन वाटवे, महेश कुलकर्णी, बंडा कुलकर्णी, कैलास देसाई यांसह अनेक जण उपस्थित होते.

अजय तेलंग पुढे म्हणाले की, हिंदु महासभेच्या माध्यमातून सावरकरांनी अखंड भारतात हे कार्य समाजापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सावरकरांनी सकारात्मक आणि द्रष्टेपणाने राजकारण करून स्वराज्यहित अन् हिंदुत्वनिष्ठ राजकीय हेतू साध्य केला. ‘राजकीय चळवळीत भाग न घेण्याची, तसेच रत्नागिरी स्थानबद्धतेची अट असूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीतून केलेल्या सामाजिक कार्यामुळेच समाज जागृती झाली. त्यामुळेच रत्नागिरीच्या तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकार्‍यांनी घाबरून ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीतून हलवा’, असे इंग्रज सरकारला पत्र लिहिले. हा इतिहास आहे आणि याचा अभ्यास केल्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणे कदापि स्वीकारले जाऊ शकत नाही.

श्री. अजय तेलंग पुढे म्हणाले की, वर्ष १९२४ मध्ये अंदमानमधून काही अटींवर इंग्रज सरकारने सावरकरांची सुटका केल्यानंतर रत्नागिरी येथे ते स्थानबद्ध होते. तेथे त्यांनी अस्पृश्यता, व्यवसाय बंदी, रोटी-बेटी आणि व्यवहार बंदी यांसारख्या समाजविघातक चालीरीती मोडून काढण्यासाठी कृतीशील प्रयत्न केले. सहभोजन, पतीतपावन मंदिराची निर्मिती, अस्पृश्यांना मंदिर प्रवेश, आंतरजातीय विवाह अशा कार्यातून त्यांनी हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी कृतीशील प्रयत्न केले.