सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना भाग्यनगर येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. तेजस्वी प्रसन्ना वेंकटापुर

१ अ. ब्रह्मोत्सव सोहळा होण्यापूर्वी झालेला स्वप्नदृष्टांत : ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवापूर्वी काही दिवस आधी मला स्वप्नात दिसले, ‘मी गर्भगृहातच तिरुपति बालाजीचे मूळ विराट स्वरूपातील दर्शन घेत आहे. मी प्रदक्षिणा घालत आहे. त्यानंतर मी मंदिराच्या बाहेर आले. तेथे उत्सवमूर्तीचा काही महोत्सव चालू होता. तेव्हा मला स्पष्टपणे देवीचे दर्शन होत होते.’

या स्वप्नानंतर दिवसभर मला पुष्कळ उत्साही वाटत होते. मला कधीच स्वप्नात भगवंताचे दर्शन झाले नव्हते. ‘मला पडलेले हे स्वप्न म्हणजे ब्रह्मोत्सव होणार असल्याविषयी मिळालेली एक पूर्वसूचना होती’, असे सोहळा पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले.

१ आ. ब्रह्मोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती

१. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आमच्या घरी काही साधकांचे संगणकीय प्रणालीद्वारे सोहळा पहाण्यासाठी नियोजन झाले होते. तेव्हा आम्ही ‘घरी साक्षात् गुरुदेवांचे आगमन होणार आहे’, असा भाव ठेवून सिद्धता केली. तेव्हा देवघरात पुष्कळ सुगंध येऊ लागला. काही साधकांनी सांगितले, ‘‘आम्हाला तुमचे घर रामनाथी आश्रमाप्रमाणेच वाटत आहे.’’ ही गुरुदेवांची कृपा आहे.

२. गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव भव्य, दिव्य आणि सुंदर होता. ‘आम्ही हा सोहळा प्रत्यक्ष पहात आहोत’, असेच आम्हाला वाटत होते. ‘आम्हीही रथासह चालणार्‍या साधकांमध्ये आहोत आणि नारायणाचे भजन गात पुढे जात आहोत’, अशी शब्दांच्या पलीकडची अनुभूती मला आली.

गुरुदेव प्रत्येक वर्षी दिव्य रूपात दर्शन देत आहेत. आमची पात्रता नसतांनाही गुरुदेव आमच्यावर भरभरून कृपा करत आहेत. त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. प्रसन्ना वेंकटापुर

अ. ‘एक वर्षापूर्वी आम्ही दूरचित्रवाणीवर तिरुपति वेंकटेश्वर स्वामींचा ब्रह्मोत्सव पहात होतो. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवांचाही असाच दिव्य ब्रह्मोत्सव साजरा झाला पाहिजे. त्या वेळी पालखीत गुरुदेव आणि त्यांच्या एका बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि दुसर्‍या बाजूला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान असतील.’

आ. ‘एक वर्षानंतर तिरुपति वेंकटेश्वर स्वामींच्या ब्रह्मोत्सवाप्रमाणेच गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव पहायला मिळाला’, हे आमचे परम सौभाग्य आहे.

३. सौ. मंगा

अ. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहात असतांना ‘आम्ही प्रत्यक्ष सोहळा पहात आहोत’, असे आम्हाला जाणवत होते. मला पुष्कळ आनंद झाला.

आ. ‘गुरुदेवांकडे पहातच रहावे. त्यांच्या चरणांवर अर्पण केलेल्या फुलांमधील मी शेवटचे फूल आहे’, असे मला वाटले.

इ. मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् पार्वती देवीच्या रूपात दिसत होत्या. ‘त्या स्मितहास्य करून मला अभिवादन करत आहेत’, असे वाटले.

४. श्री. आकाश गोयल (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे)

अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच मला वातावरणात उत्साह आणि अत्यािधक आनंद जाणवत होता. मी ५ वाजता उठून नामजप करत असतांना मला अन्य दिवसांच्या तुलनेत पुष्कळच आनंद मिळाला.

आ. साधकांकडून त्या दिवशी सर्व ठरवलेल्या कृती आणि ब्रह्मोत्सव पहाण्याच्या सिद्धतेची सेवा शीघ्र गतीने होत होती. सेवा करतांना सर्व साधकांची मने जुळलेली होती. साधकांच्या मनात ‘गुरुसेवा चांगली आणि शीघ्र गतीने व्हायला हवी’, हाच विचार होता. त्या दिवशी अन्य साधकांकडून जी सेवा करायची राहिली असेल, ती सेवा माझ्याकडून तत्परतेने केली जात होती. मला प्रत्येक सेवेतून आनंद मिळाला.

इ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ऊन पडले होते आणि नंतर अकस्मात् दुपारी आकाशात ढग जमू लागले. वातावरणात शीतलता आली.

ई. ‘गुरुदेव सर्व साधकांसाठी किती आणि काय काय करत आहेत !’, हे मला सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवता आले. माझ्या मनात गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता जागृत होत होती. माझ्या मनात ‘गुरुदेवांच्या चरणांपासून दूर जायचे नाही’, असा विचार येत होते.

उ. गुरुदेवांनी या सोहळ्याच्या माध्यमातून साधकांना पुष्कळ चैतन्य प्रदान केले आणि त्यांच्या कृपेने मला ते चैतन्य ग्रहण करता आले.

‘गुरुदेवांच्या कृपेने मला हे सर्व अनुभवता आले’, त्याबद्दल मी त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक