Bihar Heat Wave : प्रचंड उष्णतेमुळे बिहारमधील शाळेत ५० हून अधिक विद्यार्थिनी बेशुद्ध !

पाटलीपुत्र – शेखपुरा जिल्ह्याततील एका सरकारी शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थिनी प्रचंड उष्णतेमुळे अचानक बेशुद्ध पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रुग्णवाहिका बोलावल्यावरही ती वेळेत न आल्याने विद्यार्थिनींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. आरोग्य विभागाच्या या दायित्वशून्यतेमुळे लोक रस्त्यावर उतरले होते.

राज्यात प्रचंड उष्णतेतही शाळा चालूच आहेत. २९ मेच्या सकाळी अरियरी प्रखंडच्या मनकौल माध्यमिक विद्यालयात अचानक विद्यार्थिनींची शुद्ध हरपली. रुग्णालयातील डॉ. सत्येंद्र कुमार म्हणाले की, जिल्ह्यात प्रचंड उष्णता आहे. त्यामुळे मुलांच्या शरिरातील पाण्याची पातळी अल्प झाल्याने ही घटना घडली. मुलांवर उपचार चालू आहेत.

५ शहरांतील तापमान ४५ अंशांहून अधिक !

बिहारमधील ५ शहरांतील तापमान ४५ अंशांहून अधिक आहे. सर्वाधिक तापमान बिहारमधील औरंगाबाद येथील असून ते कमाल ४७.७ अंश नोंदवले गेले. डेहरी ४७ अंश, अरवल ४६.९ अंश, गया ४६.८ अंश आणि बक्सरचे कमाल तामपान ४६.४ अंश नोंदवले गेले. राजधानी पाटलीपुत्राचे तापमानही ४२.८ अंश इतके आहे.