Vladimir Putin : रशियावर आक्रमण करणार्‍या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील !

युक्रेनकडून शस्त्रे मिळालेल्या देशांना पुतिन यांनी दिली चेतावणी !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – युक्रेनकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांसह कोणत्याही देशाने रशियावर आक्रमण केल्यास त्या देशाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली. २ दिवसांपूर्वी काही पाश्‍चात्त्य देशांनी युक्रेनला रशियाविरोधात शस्त्रे वापरण्यास सांगितले होते. यासाठी पहिली अनुमती लॅटव्हियन राष्ट्राध्यक्ष एडगर्स रिंकेविक्स यांनी दिली होती. यानंतर ब्रिटन आणि स्विडन या देशांनीही असेच केले. काही दिवसांपूर्वी ब्रिटनने युक्रेनला लांब पल्ल्याचे ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्र पाठवले होते. हे क्षेपणास्त्र रशियाच्या आत २५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. एवढेच नाही, तर स्विडनने युक्रेनला सेल्फ क्टिव्ह तोफांचे तंत्रज्ञानही पाठवले आहे.

पुतिन यांनी म्हटले की, पाश्‍चिमात्य देशांना ‘आपण कुणासमवेत खेळत आहोत ?’ हे कळायला हवे. विशेषतः युरोपातील लहान देश. जर युक्रेनने रशियावर आक्रमण केले, तर त्याला पाश्‍चात्त्य देश थेट उत्तरदायी असतील. पाश्‍चात्त्य देशांतील भाडोत्री सैनिक युक्रेनमध्ये लढत आहेत आणि त्यांपैकी बहुतेकांना फ्रान्स पाठवत आहे. भाडोत्री सैनिकांच्या वेशात तज्ञ उपस्थित आहेत; परंतु तेही रशियाच्या सैन्याकडून पराभूत होतील. रशियाला वाचवण्यासाठी आम्ही काहीही करायला सिद्ध आहोत.