‘ससून’मधील रक्ताचे नमुने पालटल्याप्रकरणी ‘विशेष चौकशी समिती’द्वारे अन्वेषण !

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ अपघात प्रकरण !

पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपीचे ‘ब्लड सँपल’ (रक्ताचा नमुना) पालटल्या प्रकरणी ‘ससून’मधील २ आधुनिक वैद्य अजय तावरे, डॉ. हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे याला अटक करण्यात आली आहे. ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी राज्यशासनाकडून ‘विशेष चौकशी समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद जे.जे. हॉस्पिटलच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे देण्यात आले आहे. डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी हे त्यांना साहाय्य करणार आहेत. ही समिती २९ मे या दिवशी चौकशी करणार आहे.

मुख्य आरोपीच्या ‘ब्लड सँपल’मध्ये मद्यांश नाही !

‘पोर्शे’ कार चालवत अपघात करणार्‍या मुख्य आरोपीचे २ ‘ब्लॅड सँपल’ घेतली होती. औंध रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यामध्ये ‘मद्यांश’ असल्याचे आढळून आले नाही. अपघातानंतर दीड घंट्यांच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्तामध्ये ‘मद्यांश’ आढळून आले नाही. अपघात १९ मेच्या मध्यरात्री अडीच वाजता घडला. आरोपीस सकाळी ९ वाजता ‘ससून’मध्ये भरती केल्यानंतर ११ वाजता रक्ताचे नमुने घेण्यात आले. या अहवालाचा खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रक्ताचा नमुना देणारा कोण ?

मुख्य आरोपीच्या रक्ताऐवजी दुसर्‍याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेतला गेला आहे. मुख्य आरोपीस वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने देणार्‍या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध चालू करण्यात आला आहे. या प्रकरणात मध्यस्थी करणारे घटकांबळे यांच्या घराची झडती घेतल्यानंतर अडीच लाख रुपयांची रोकड जप्त केली, तसेच अटकेतील डॉ. तावरे यांनी ‘मी शांत बसणार नाही. या प्रकरणातील सगळ्यांना उघडे पाडेन’, अशी चेतावणी दिल्याचे ‘फ्री प्रेस’च्या वृत्तातून समोर येत आहे.

‘पोर्शे’कारमध्ये बिघाड नाही !

अपघात घडला तेव्हा गाडीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, असा प्राथमिक निष्कर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढला आहे. त्यानंतर या गाडीची पडताळणी ‘पोर्शे’ आस्थापनाच्या तंत्रज्ञांच्या पथकानेही २७ मे या दिवशी केली. त्याचा अहवाल ३ दिवसांनी पोलिसांकडे सादर केला जाणार आहे.

‘ससून’ची प्रतिमा डागाळली आहे ! – सुप्रिया सुळे, खासदार

गेल्या काही दिवसांपासून ‘ससून’या रुग्णालयाविषयी सातत्याने तक्रारी येत आहेत. काही महिन्यांपूर्वी अमली पदार्थाची विक्री करणारा ललित पाटील याचे प्रकरण बाहेर आले. आता कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने पालटल्याचे समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणांमुळे ‘ससून’ची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली आहे. यातील दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी.

आरोपीचे रक्त नमुने पालटणार्‍या आधुनिक वैद्यांना नोटीस; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून कारवाईचे संकेत !

या प्रकरणात पुणे येथील ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हरलोर या आधुनिक वैद्यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने पालटून दुसर्‍याचे नमुने न्यायवैद्यकशाळेत पडताळणीला पाठवले होते. या प्रकरणात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एम्.एम्.सी.) दोन्ही आधुनिक वैद्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. उत्तरासाठी ७ दिवसांचा कालावधी दिला गेला आहे. त्यांच्या उत्तरानंतर एम्.एम्.सी.मधील तज्ञांची समिती या प्रकरणाची आणखी चौकशी करील. त्यात हे आधुनिक वैद्य दोषी आढळल्यास त्यांची नोंदणी कायमची रहित करण्याचे अधिकारही एम्.एम्.सी.ला आहेत.