आचार्य वराहमिहीर यांनी संशोधिलेली भारतीय ज्ञान परंपरेतील भूगर्भ जलसंशोधन पद्धत

आचार्य वराहमिहीर

ज्योतिषशास्त्रातील विद्वान आचार्य वराहमिहीर यांच्याद्वारे लिखित ‘बृहतसंहिता’ या ग्रंथात ‘दकार्गल’ अध्याय (भूमीगत जल शोधण्याची पद्धत) आहे. भूमीतील जलपरीक्षेविषयी ऋषिमुनींनी विपुल संशोधन करून ‘अंतर्जल संशोधन पद्धत’ विकसित केली आणि माहितीचे संकलन करून ते अखिल मानवजातीसाठी उपलब्ध केले. ‘दकार्गल’ अध्यायात १२५ श्लोक असून जवळपास १२० पेक्षा अधिक वृक्ष, झाडे, वेली आणि वनस्पतींच्या स्वरूपात अंतर्जल शोधण्याची लक्षणे सांगितलेली आहेत. झाडापासून पाण्याची दिशा, अंतर, पाण्याची खोली, तसेच खोदकाम करतांना आढळणारी लक्षणे यांविषयी आचार्य वराहमिहीर यांनी सर्वांगस्पर्शी माहिती दिलेली आहे. गाव किंवा घरात दिशांनुसार विहिरीचे शुभाशुभत्व, तसेच वनस्पतींचा वापर करून जलशुद्धीकरण कसे करावे ? याविषयीही आचार्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. ‘दकार्गल’ अध्यायात सांगितलेली काही वृक्ष, झाडे आणि वनस्पती नामशेष झाली आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वृक्षतोड आणि वृक्षारोपणाची कमतरतता हे यामागील सर्वांत मोठे कारण आहे.

१. आचार्य वराहमिहीर यांनी विहिरीसाठी खोदकाम केल्यावर अंतर्जल उपलब्ध होण्याविषयी केलेला अभ्यास

श्री. अक्षय नागेश पांडे

पाताळापासून म्हणजे खालून वर ज्या शिरा येतात आणि मुख्य चार दिशेस ज्या शिरा उत्पन्न होतात, त्या शुभ आणि आग्नेयादी कोन दिशेस ज्या शिरा असतात त्या अशुभ असतात. ‘दकार्गल’ शास्त्रानुसार विहिरीसाठी खोदकाम केल्यावर अंतर्जल उपलब्ध झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

सारस्वत मुनींनी केलेल्या ‘दकार्गला’वर आचार्य वराहमिहिरांनी संशोधन करूनच नवीन ‘दकार्गल’ लिहिले असावे, असे वाटते. त्यासाठी सहस्रो ठिकाणी जाऊन अनेकविध झाडांजवळ संशोधन करून स्पंदनांचा अभ्यास केला. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष खोदकाम करून विविध दिशांना वाहणार्‍या शिरांचा अभ्यास केला. खोदकामाच्या वेळी पालटत जाणार्‍या मातीच्या थरांचा, भूजल निर्देशक म्हणून प्राप्त होणार्‍या जैविक लक्षणांचा, भूमी प्रदेशानुसार पडणार्‍या भूभागांचा, तसेच विविध प्रकारच्या मातीचा, झाडांच्या आजूबाजूला असलेल्या वारूळांचा आणि खोदकामाच्या वेळी आढळणार्‍या शिलेचा अभ्यास आचार्य वराहमिहीर यांनी निश्चित केलेला असावा.

अनूप (भरपूर पाणी) असणार्‍या जलस्रोताचे प्रातिनिधिक छायाचित्र

२. ‘दकार्गल’मध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती

‘दकार्गल’मध्ये देण्यात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे –

अ. भूमी प्रदेशानुसार पडणारे भूभाग : अनूप (भरपूर पाणी असणारे, पाणथळ), जंगल, मरुदेश (जलरहित देश मारवाड).

आ. मातीचा प्रकार : काळी माती, पीतवर्ण (पिवळी) माती, पांढरी माती, नीलवर्ण (निळी) माती, धुसरा (काळी-पांढरी) माती, रेतीयुक्त पांढरी माती, पिंगट माती, कपोताच्या रंगाची माती, तांबडी माती.

इ. पाषाणाचा (दगडाचा) प्रकार : पुटभेदक पाषाण, कुंकवाच्या रंगाचा पाषाण, कुरुविंद (गुलाबी किंवा रक्तवर्णाचा) पाषाण, काळा पाषाण, बेडकासारख्या वर्णाचा (हिरवा) पाषाण, कुळ्यांसारख्या रंगाचा पाषाण, धुसरवर्ण पाषाण, तांब्याच्या रंगाचा पाषाण, पिठासारखा पाषाण.

ई. खोदकामाच्या वेळी प्राप्त होणारे जैविक लक्षणे : पांढरा बेडूक, तीत बेडूक, काळा बेडूक, श्वेत सर्प, पांढरी पाल, दुतोंड्या सर्प, पीतवर्ण सर्प, पांढरा उंदीर, मुंगूस इत्यादी.

उ. स्थानानुसार शुभाशुभत्व : गावाच्या किंवा शहराच्या आग्नेय दिशेला जर जलाशय (तलाव, कूप) असेल, तर तो नित्य भय आणि मनुष्यास दाह करणारा ठरतो. नैऋत्येस असेल, तर बालक्षय करतो; वायव्येस असेल, तर स्त्रियांना भय निर्माण करतो, हे द्विक्षय सोडून अन्य दिशेस असणारे जलाशय शुभसूचक आहेत.

ऊ. विहिरीजवळ लावण्यायोग्य झाडे : अर्जुनवृक्ष, वट, आम्र, पाईर, कदंब, कडुनिंब, जांभूळ, वेत, कोर्‍हाटा, ताड, अशोक, मोहा, बकुळ.

ए. विहिरीतील जलशुद्धीसाठी वापरण्यात येणार्‍या वनस्पती : अंजन (कटुकी किंवा काळी कापशी), नागरमोथा, वाळा, शिरदोडकी, मोठी घोसाळी, कतक फल यांचे चूर्ण एकत्रित करून विहिरीमध्ये टाकल्यास गढूळ, कडू, क्षार, विरस आणि अशुभ गंध असेही पाणी स्वच्छ, सुरस, सुगंधी या गुणांसह अन्य चांगल्या गुणांनी युक्त होते.

ऐ. बोरवेल किंवा विहिरीसाठी खोदकामास प्रारंभ करण्यायोग्य नक्षत्रे : हस्त, मघा, पुष्य, अनुराधा, धनिष्ठा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, शततारका हा नक्षत्र समुदाय खोदकामास आरंभ करण्यासाठी प्रशस्त आहे.

३. आचार्य वराहमिहिर यांनी सांगितलेली अंतर्जल संशोधन पद्धत अत्यंत उपयोगी असल्याचे सर्वेक्षणातून सिद्ध

‘कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक’च्या (नागपूर) ‘वेदांग ज्योतिष विभागा’द्वारे प्राध्यापक प्रसाद गोखले आणि प्राध्यापक दिनकर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण जलस्रोतांचे भारतीय ‘दकार्गल’ पद्धतीवर आधारीत सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणासाठी ‘एआयसिटीई’, म्हणजे ‘अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदे’च्या ‘भारतीय ज्ञान परंपरा (आय.के.एस्.) विभागा’द्वारे अनुदान प्राप्त झाले आहे. या सर्वेक्षणाच्या वेळी असे आढळून आले आहे की, आचार्य वराहमिहिर यांनी सांगितलेली अंतर्जल संशोधन पद्धत अत्यंत उपयोगी आहे. वड, पिंपळ, औदुंबर, बेल, आंबा, मोहाचे झाड, बेहडा, कडूनिंब आणि जांभूळ ही झाडे सर्वेक्षणाच्या वेळी विशेषत्वाने जलस्रोतांजवळ आढळली आहेत. यातील सर्वच झाडांचा उल्लेख ‘दकार्गल’ अध्यायात आहे. आचार्य वराहमिहीर यांनी अनेक श्लोकात वृक्षाजवळील वारूळाकडे अंगुलीनिर्देश केलेला आहे.

४. सद्यःस्थितीत अंतर्जलाची नैसर्गिक लक्षणे ओळखणे अवघड आणि पाण्याच्या वापराविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता !

शहरीकरणामुळे वृक्षतोड करतांनाच आजूबाजूची वारूळेसुद्धा उध्वस्त करण्यात येतात. त्यामुळे अंतर्जल असल्याची नैसर्गिक लक्षणे ओळखणे अवघड होत चालले आहे. यासह खोदकाम करतांना आढळणारी जैविक लक्षणे भूजल पातळी खालावल्यामुळे आढळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. सरकारी नळजोडणीमुळे घरोघरी पाणी सहजतेने उपलब्ध होत असल्यामुळे रहिवासी भागातील परिसरात असलेल्या विहिरींना स्थानिक नागरिकांनी कचराकुंडी बनवल्याचे सर्वेक्षणाच्या वेळी लक्षात आले आहे. हे अतिशय गंभीर आहे. सध्याचा कालखंड अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असणारा आहे. त्यामुळे पाण्याच्या वापराविषयी जागरूक असणे आणि नैसर्गिक समतोल बिघडू नये, यांसाठी वृक्षारोपण, ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ करणे (पावसाचे पाणी साठवणे) आवश्यक झाले आहे.

– श्री. अक्षय नागेश पांडे, प्रकल्प साहाय्यक, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर. (२२.५.२०२४)