आज ‘संत चोखामेळा यांची पुण्यतिथी’ आहे. त्या निमित्ताने…
एक दिवस श्री विठ्ठलाने चोखोबांना ‘मी तुझ्याकडे जेवायला येतो’, असे सांगितले. हे कळताच चोखोबांची पत्नी सोयराबाई यांना फार आनंद
झाला. ही गोष्ट सोयराबाईंनी नकळत एका महिलेला सांगितली. काही वेळातच ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. अनेकांनी ही गोष्ट थट्टेवारी नेली. एक गृहस्थ त्या रात्री लपत चोखोबांच्या झोपडीजवळ आले. त्यांनी आत डोकावून पाहिले, तेव्हा विठ्ठलमूर्तीच्या पायांशी चोखोबा बसलेले होते. जवळच सोयराबाई नम्रतेने उभी होती. सोयराबाईंनी जेवणाची पाने वाढली. विठ्ठलाने जेवायला प्रारंभ केला. त्याच वेळी चोखोबांचे शब्द त्या गृहस्थांच्या कानांवर पडले. चोखोबा सोयराबाईंना म्हणत होते, ‘सोयरा जरा हळू. देवाच्या पितांबरवर ताक सांडले ना !’ ही घटना पाहून ते गृहस्थ तेथून निघाले. त्यांनी पाहिलेली आणि ऐकलेली गोष्ट ते भेटेल त्याला सांगत सुटले. संत चोखोबांच्या घराभोवती मोठी गर्दी जमली. ही गोष्ट विठ्ठल मंदिराच्या पुजार्यांपर्यंत गेली. मंदिरातील पुजार्यांनी खरे-खोटे करण्याचे ठरवले. सर्व जण मंदिरापाशी जमा झाले. मंदिराचे द्वार उघडून पाहिले असता तेथील दृश्य पाहून सर्वच थक्क झाले. नेहमीप्रमाणेच श्री विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी होती. वस्त्रे, आभूषणेही तशीच होती; परंतु नेसवलेल्या पितांबरावर मात्र ताक सांडलेले दिसत होते. प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात चोखोबांच्या घरी जाऊन जेवला, हे पाहून पुजार्यांसह सर्वांनीच त्या थोर संत चोखोबांचे पाय धरले. त्यांचे संतत्व सिद्ध झाले.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.