सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त अखिल विश्वाच्या कल्याणासाठी  सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे १४ आणि १५ मे २०२३ या दिवशी मार्कण्डेयऋषि रचित ‘श्रीदेवीसप्तशती’मधील ७०० श्लोकांचे मंत्रोच्चारण करून सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘चंडीयाग’ करण्यात आला. देवाच्या कृपेने या यागाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी रेखाटलेले रक्तचामुंडादेवीचे चित्र

१. आदिशक्तीच्या विविध रूपांचे आध्यात्मिक महत्त्व !

१ अ. चंडीदेवी आणि चामुंडीदेवी या जुळ्या देवी : पुराणकाळात शिव आणि कालिका माता (पार्वती) यांच्यापासून उत्पन्न झालेल्या देवी कौशिकीशी लढण्यासाठी स्वर्गविजेते अन् पाताळातील परमबलशाली दैत्य महाबली शुंभ आणि निशुंभ येतात. ते त्यांचे सेनापती पाताळ निवासी महाबली दैत्य चंड आणि मुंड या जुळ्या दैत्यांना देवीशी लढण्यासाठी पाठवतात. तसेच त्यांच्या समवेत ‘धूर्मलोचन’ हा असुरही येतो. तेव्हा कालिकादेवी त्याचा त्वरित नाश करते. तेव्हा ‘मीनाक्षी’ या मूलतत्त्वापासून आणि ‘श्री दुर्गादेवी’च्या सगुण रूपापासून श्री चंडीदेवी आणि श्री चामुंडीदेवी या जुळ्या देवींची निर्मिती झाली. श्री चंडीदेवीने चंड दैत्याचा आणि श्री चामुंडीदेवीने मुंड दैत्याचा संहार केला. पश्चिम भारतातील गुजरात राज्यातील ‘चोटिला’ येथील ‘श्री चंडी-श्री चामुंडी’ या जुळ्या देवींचे मंदिर आहे. श्रीदेवी आणि भूदेवी या दोन्ही देवीही श्रीविष्णूच्या भार्या असल्यामुळे त्या एकमेकींशी जोडल्या आहेत. त्यामुळे श्रीभूदेवीचा अवतार असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये श्री चंडीदेवीचे आणि श्रीदेवीचा अवतार असलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्री चामुंडादेवीचे तत्त्व श्री चंडीयागाच्या वेळी कार्यरत झाले होते.

१ आ. रक्तचामुंडा : जेव्हा पाताळ निवासी महाबली दैत्य चंड आणि मुंड यांचा वध झाला, तेव्हा दैवी कौशिकीशी लढण्यासाठी महाबली शुंभ आणि निशुंभ पाताळनिवासी पराक्रमी दैत्य ‘रक्तबीज’ याला पाठवतात. या दैत्याच्या रक्ताचा एक जरी थेंब भूमीवर पडला, तर त्यातून दुसरा रक्तबीज (‘रक्तबीज’ या मूळ दैत्याचे मायावी रूप ) निर्माण होत होता. अशा प्रकारे देवासुरसंग्रामात देवसेनेने रक्तबिजावर आक्रमण केल्यामुळे त्याच्या रक्ताच्या अनेक थेंबांतून अनेक रक्तबीज निर्माण झाले होते. हे रक्तबीज संपूर्ण देवसेनेचा नाश करत होते. हा विनाश थांबवण्यासाठी ‘मीनाक्षी’ या मूलतत्त्वापासून आणि ‘श्री दुर्गादेवी’च्या सगुणरूपापासून श्री रक्तचामुंडादेवीची निर्मिती झाली. तिने रक्तबिजाच्या देहातून पडलेला प्रत्येक थेंब चाटून त्याचे मायावीरूप नष्ट केले आणि नंतर त्याच्याशी घनघोर युद्ध करून त्याच्या मूळ रूपाचा नि:पात केला. त्यामुळे तिला ‘रक्तचामुंडा’ हे नाव प्राप्त झाले.

१ इ. उग्रचंडी किंवा उग्रचामुंडी : देवासुर संग्रामामध्ये जेव्हा महाकाली उग्र रूप धारण करून असुरांशी बेभान होऊन लढून त्यांचा नाश करते, तेव्हा तिचे रूप अत्यंत उग्र आणि विक्राळ असते. या रूपातून प्रचंड प्रमाणात मारक शक्ती प्रक्षेपित होत असल्यामुळे ती देवीच्या भक्तांना सहन होत नाही आणि तिचे हे महाविक्राळ अन् उग्ररूप पहाणेही त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे तिचे भक्तजन तिला ‘उग्रचंडी’ किंवा ‘उग्रचामुंडी’, या नावाने भक्तीभावाने संबोधतात.

१ ई. महाचंडी किंवा महाचामुंडी : देवासुर संग्रामामध्ये जेव्हा दैत्य उग्र, अक्राळ-विक्राळ, विराट आणि विविध पशू-पक्षी किंवा बीभत्स दिसणारी मायावी रूपे घेऊन देवसेनेशी लढू लागतात, तेव्हा देवीही महाकाय आणि विराट रूप धारण करते. देवीचे भक्तगण तिच्या या विश्वव्यापी महाकाय रूपाला ‘महाचंडी किंवा महाचामुंडी’, या नावाने आदरभावाने संबोधतात.

१ उ. साहाय्यक देवी : श्रीब्रह्मदेव आणि श्रीविष्णु यांच्यापासून निर्माण झालेल्या ब्राह्मी, ऐंद्री, वज्रेश्वरी, कौमारी, वारुणी, गारुडी, यक्षेश्वरी, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, नारसिंही इत्यादी देवी श्री चंडी, श्री चामुंडी आणि श्री महाचंडी यांच्या साहाय्यासाठी येऊन त्या मोठ्या वाईट शक्तींचा नाश करतात.

(क्रमश:)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)  (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798415.html