‘महर्षींच्या आज्ञेवरून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शारदीय नवरात्रीत पहिले ६ दिवस ‘श्री शाकंभरीयाग’; सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी ‘चंडीयाग’ अन् विजयादशमीला ‘महामृत्यूंजय याग’ करण्यात आले. त्यानिमित्ताने आपण ‘श्री शाकंभरीदेवी’चे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ.

१. विविध याग करण्यामागील उद्देश !
१ अ. शाकंभरीयाग : यामुळे आपत्काळात साधकांना अन्न आणि पाणी मिळण्याची सुविधा होणार आहे.
१ आ. चंडीयाग : या यागाद्वारे श्री चंडी, श्री चामुंडी, श्री चंडिका, श्री चंडमारी, श्री चामुंडेश्वरी आणि रक्तचामुंडा या देवींना प्रसन्न केल्याने त्यांची कृपा संपादन होते. त्यामुळे साधकांना त्रास देणार्या पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींचा निःपात करून साधकांना होणारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होणार आहेत.
१ इ. महामृत्यूंजय याग : या यागाद्वारे शिवाला प्रसन्न करून घेऊन साधकांचे अकाल मृत्यू आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळणार आहे.

२. श्रीविष्णूच्या संकल्पाने मनुष्यासाठी हितकारक असणार्या पुढील देवदेवतांची निर्मिती होणे
सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी प्रजापति आणि आदिशक्ती यांच्या संयुक्त तत्त्वापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. भूदेवीपासून भूमी, वनस्पती आणि पशूपक्षी यांची निर्मिती झाली. ब्रह्मपुत्र मनु आणि त्यांची पत्नी शतरूपा यांच्यापासून मानवाची निर्मिती झाली. सृष्टीचे संचालन करणार्या श्रीविष्णूच्या संकल्पाने मनुष्यासाठी हितकारक असणार्या पुढील देवतांची निर्मिती झाली.
२ अ. श्री शताक्षीदेवी आणि श्री शाकंभरीदेवी यांची निर्मिती : जेव्हा पृथ्वीवर प्रचंड दुष्काळ पडला होता आणि अन्नधान्य पिकत नव्हते, तेव्हा सर्व भाज्या-फळांच्या जाती लुप्त झाल्या होत्या. तेव्हा ऋषिमुनी आणि समस्त देवता यांनी हे संकट दूर होण्यासाठी श्री आदिशक्तीची उपासना केली. त्यानंतर आदीशक्तीपासून श्री शताक्षीदेवी आणि श्री शाकंभरीदेवी यांची निर्मिती झाली.
२ अ १. श्री शताक्षीदेवी : मनुष्य आणि पशूपक्षी यांची ‘तृष्णा’, म्हणजे तहान शांत करण्यासाठी ‘भूदेवी आणि श्रीविष्णू’ यांच्यापासून शताक्षीदेवीची निर्मिती झाली. तृष्णेने व्याकूळ झालेले जीव पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या आणि त्यांच्यापासून विविध नद्यांची निर्मिती झाली. त्यामुळे समस्त जिवांची तहान शांत झाली.
२ आ. श्री शाकंभरीदेवीची निर्मिती : मनुष्याची ‘क्षुधा’, म्हणजे ‘भूक’ शांत करण्यासाठी मनुष्याला ‘शाक’ म्हणजे भाज्या (पालेभाज्या आणि फळभाज्या) देणार्या श्री शाकंभरीदेवीची निर्मिती ‘भूदेवी आणि श्रीविष्णू’ यांच्यापासून झाली. त्यामुळे मनुष्याची भूक शांत झाली.
२ आ १. श्री शाकंभरीदेवीचे कार्य : मांसाहारी भोजन रज-तम प्रधान असल्याने ते असुरांना प्रिय असते, तर शाकाहारी भोजन सत्त्वप्रधान असल्यामुळे देवतांना प्रिय असते. श्री शाकंभरीदेवीमुळे मनुष्याला शाकाहारी भोजन प्राप्त होण्यास साहाय्य होते. त्यामुळे केवळ मनुष्याची भूकच शांत होते, असे नाही, तर त्याची सात्त्विकता वाढण्यासही साहाय्य होते.
२ आ २. येणार्या आपत्काळात साधकांवर श्री शाकंभरीदेवीची कृपा होणार असणे : येणार्या काही वर्षांत पृथ्वीवर नैसर्गिक, तसेच मानवनिर्मित आपत्ती येऊन भयंकर आपत्काळ उद्भवणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जिवांना अन्न आणि पाणीसुद्धा मिळणे दुर्लभ होणार आहे. अशा वेळी सात्त्विक मनुष्यांसाठी श्री शताक्षीदेवीच्या कृपेने पाणी आणि श्री शाकंभरीदेवीच्या कृपेने भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या दोन्ही देवींच्या कृपेने सात्त्विक जीव आपत्काळातही जिवंत रहाणार आहेत.
२ इ. श्री शाकंभरीदेवीला साहाय्यक असणार्या विविध देवी

२ इ १. श्री वनदुर्गा : संपूर्ण वनप्रदेशावर हिचे अधिपत्य आहे. त्यामुळे पृथ्वीवरील असंख्य जीव वनप्रदेशात राहून सुरक्षित जीवन जगू शकतात. भूदेवी आणि श्री वनदुर्गा यांच्या संयुक्त तत्त्वांमुळे विविध फुले, पाने, वेली आणि वृक्ष यांची निर्मिती झाली.
२ इ २. श्री कमला : भूदेवी आणि श्री कमलादेवी यांच्या संयुक्त तत्त्वांमुळे विविध रंग, सुगंध आणि आकार असणार्या असंख्य फुलांची निर्मिती झाली. त्यामुळे भूदेवी फुलांनी सुशोभित होऊन सुंदर दिसू लागली.
२ इ ३. श्री वृंदादेवी आणि धन्वन्तरिदेव : वृंदादेवी (भूदेवीचा अंश) आणि धन्वन्तरि (श्रीविष्णूचा अंश) यांच्या संयुक्त तत्त्वांमुळे पृथ्वीवर तुळशीसारख्या अनेक आयुर्वेदीय वनस्पतींची निर्मिती झाली. त्यामुळे मनुष्याला विविध रोगांवर उपचार करण्यासाठी सत्त्वप्रधान असणारी आयुर्वेदीय औषधे उपलब्ध झाली आहेत.
२ इ ४. श्री धान्यलक्ष्मी किंवा श्री धान्यमालिनी : ‘श्री धान्यलक्ष्मी’ हे अष्ट महालक्ष्मींपैकी श्री महालक्ष्मीचे एक रूप आहे. तिच्या कृपेने मनुष्याला शेतामध्ये विविध प्रकारचे धान्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मनुष्याचा उदरनिर्वाह चालतो.
२ इ ५. श्री अन्नपूर्णा : ही देवता म्हणजे पार्वतीचेच एक रूप असून ती केवळ शिवालाच नव्हे, तर समस्त देवता आणि मनुष्य यांना अन्न उपलब्ध करून देते.
२ इ ६. श्री विशालाक्षी : श्री अन्नपूर्णाच विशाल नेत्रांनी जेव्हा सृष्टीतील भुकेल्या जिवांचे अवलोकन करते, तेव्हा तिला ‘श्री विशालाक्षी’ असे संबोधले जाते.
२ इ ७. श्री मीनाक्षी किंवा श्री श्यामला : देवीच्या उजव्या हातात कमळ आहे आणि त्या कमळावर एक पोपट बसलेला आहे. हा पोपट सतत वेदमंत्र म्हणून देवीची स्तुती करत असतो आणि तिला भक्तांविषयी सांगत असतो. ही समृद्धीची देवी असून ती
श्री शांकभरीदेवी, श्री अन्नपूर्णादेवी आणि अन्य देवी यांना पृथ्वीवरील जिवांचा प्रतिपाळ करण्यासाठी साहाय्य करीत असते.
२ इ ८. श्री कामाक्षी : या देवीच्या एका हातात ऊसाचे धनुष्य आणि दुसर्या हातात फुलांचे ५ बाण आहेत. ही तिच्या उपासकांच्या समस्त मनोकामना पूर्ण करत असते. तिच्या कृपेनेच श्री मीनाक्षी, श्री विशालाक्षी, श्री अन्नपूर्णा इत्यादी देवींना कार्य करण्यासाठी दैवी बळ प्राप्त होते.
३. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी होणारा याग, कार्यरत असणारे देवतातत्त्व आणि श्री शाकंभरीदेवीला तिचे कार्य करण्यासाठी साहाय्यक असणार्या विविध देवी अन् त्या देवीतत्त्वांचा रंग
टीप : शाकंभरीदेवीला साहाय्यक असणार्या विविध देवींचे तत्त्व नवरात्रीतील विविध दिवशी कार्यरत होते. या देवीतत्त्वांचा लाभ साधकांना होऊन त्यांचा आध्यात्मिक उत्कर्ष व्हावा, यासाठी महर्षींनी नवरात्रीत साधकांना प्रत्येक दिवशीच्या देवीतत्त्वांच्या रंगानुसार वस्त्र परिधान करण्यास सांगितले आहे.
कृपा करावी आम्हावरी, हे ईश्वरी ।
हे अखिल ब्रह्मांडाची अखिलांडेश्वरी ।
तू १४ भुवनांची स्वामिनी, हे श्री भुवनेश्वरी ।। १ ।।
तू पराक्रम गाजवणारी, हे दुर्गा परमेश्वरी ।
तू संपूर्ण ऐश्वर्याने युक्त असणारी, हे श्री राजराजेश्वरी ।। २ ।।
तू सर्वांना शाक आणि फळे देणारी, हे शाकंभरी ।
तू हिमालयात वास करणारी, हे महागौरी ।। ३ ।।
तू सर्व कामनांचे मूळ रूप असणारी, हे कामेश्वरी ।
कमळाप्रमाणे कोमल असणारी, हे कमलेश्वरी ।। ४ ।।
तू आत्मज्ञान देणारी साक्षात्, हे ज्ञानेश्वरी ।
तू भवसागरातून तारून नेणारी, हे तारकेश्वरी ।। ५ ।।
हे चराचर व्यापून टाकणारी सर्वेश्वरी ।
कृपा करावी आम्हावरी हे ईश्वरी ।। ६ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले
४. अनुभूती
शाकंभरीयागाचे सूक्ष्म परीक्षण करत असतांना मला पुढील अनुभूती आली. ‘मला सहस्र पाकळ्या असणारे एक मोठे गुलाबी रंगाचे दिव्य कमळ दिसले. त्याच्या मध्यभागी कांचीपुरम् येथील श्री कामाक्षीदेवी विराजमान होती. तिच्या डावीकडे काशीपुरीची श्री विशालाक्षी आणि उजवीकडे मदुराई येथील श्री मीनाक्षीदेवी एकेका पाकळीवर बसलेल्या दिसल्या. अशा प्रकारे ‘श्री शाकंभरीदेवी, श्री शताक्षीदेवी, श्री वनदुर्गा, श्री धान्यमालिनी, श्री अन्नपूर्णा, श्री कमला इत्यादी देवी या विशाल कमळाच्या विविध पाकळ्यांवर विराजमान आहेत’, असे दिसले. तेव्हा मला माझ्या डोक्यावर हे विशाल कमळ स्थित असून त्यातून प्रक्षेपित होणारे शीतल चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून देहात झिरपतांना जाणवले आणि माझा संपूर्ण देह शीतल होऊन माझे मन शांत अन् प्रसन्न झाल्याचे जाणवले.
कृतज्ञता : ‘श्री गुरुकृपेमुळे मला श्री शाकंभरीदेवी आणि अन्य देवी यांच्याविषयीचे ज्ञान मिळाले आणि अनुभूती आली’, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ आणि टंकलेखन करण्याची वेळ ५.१०.२०२४ सकाळी ८.३० ते ८.४५)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |