आम आदमी पार्टी अनुसूचित जातीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांची गरळओक !
पुणे – २५ डिसेंबर १९२७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. ‘मनुस्मृतीत लहानपणी मुलीने त्यांच्या वडिलांच्या छत्राखाली असावे, लग्नानंतर पतीच्या, पतीचे निधन झाल्यानंतर तिने तिच्या मुलाच्या कृपेवर रहावे; पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलेने स्वतंत्र असू नये’, मनुस्मृतीच्या ५व्या अध्यायात अशा अर्थाचा २४८ वा श्लोक आहे. महिलांच्या संदर्भात मनुस्मृति काय सांगते ? हे या श्लोकावरून स्पष्ट होते. (वरील श्लोक स्त्रियांची काळजी घेण्याच्या दृष्टीने, स्त्रीच्या रक्षणासाठी मनुने मनुस्मृतीमध्ये दिला आहे. हा त्यातील मोठा अर्थ ‘आप’ला लक्षात आला नाही का ? – संपादक) १५४, १५५, १५७ असे अनेक श्लोक महिलांविषयी अपमानकारक आहेत. त्यामुळे श्लोकांचा कुठलाही समावेश शालेय शिक्षणात घेऊ नये. भारतात राज्यघटना लागू आहे. अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातीयवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करू, असे मत ‘आम आदमी पार्टी, अनुसूचित जाती’चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.
‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने (‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदे’ने) नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय शिक्षणाच्या पुस्तकात मनुस्मृतीमधील एका श्लोकाचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या पार्श्वभूमीवर कांबळे यांनी हे मत व्यक्त केले आहे. पुणे आम आदमी पक्षाच्या वतीने ‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या महासंचालक डॉ. शोभा खंदारे यांना निवेदन सादर करण्यात आले.
मनुस्मृतीमध्ये ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात’, असा अर्थ सांगणारा श्लोक आहे. हिंदु धर्माने महिलांना कधीही अन्य पंथांप्रमाणे उपभोग्य वस्तू मानले नाही. उलट हिंदु धर्माने स्त्रीला आदिमाया शक्तीचे रूप मानले आहे. विवाहानंतर कोणतीही पूजा पत्नीच्या सहभागाविना पूर्ण होत नाही. हिंदु धर्मामध्ये देवतांची नावेही लक्ष्मी-नारायण, सीता-राम, राधे-श्याम, गौरी-शंकर अशा प्रकारची आहेत. जेथे स्त्रियांना पुरुषांपेक्षाही उच्च स्थान दिले आहे. त्यामुळे मनुस्मृतीवर अशी खोटी टीका करण्याऐवजी ‘आप’ने मनुस्मृतीचा अभ्यास करावा ! |