रेल्वेतून खाली पडल्याने ३१ वर्षीय तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले !

गर्दुल्ल्याच्या फटक्याचा परिणाम !

दादर – येथील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये काम करणार्‍या ३१ वर्षीय जगन जंगले यांना रेल्वे अपघातात त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. रात्री ८.३० वाजता त्यांनी दादरहून कल्याणला जाणारी लोकल पकडली आणि दरवाजात उभे राहून ते प्रवास करत होते. एका गर्दुल्ल्याने भ्रमणभाष हिसकावण्यासाठी त्यांच्या हातावर फटका मारला. या वेळी तोल गेल्याने जगन लोकलमधून खाली पडले आणि त्यांच्या पायावरून लोकल गेली. त्यामुळे ते गंभीर घायाळ झाले. याच वेळी त्यांचा भ्रमणभाषही गहाळ झाला.

रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या साहाय्याने त्यांना रुग्णालयात भरती केले. झालेल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जगन कुटुंबात एकुलते एक कमवणारे आहेत. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. ३ महिन्यांपूर्वीच जगन यांचे लग्न झाले होते. त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले असून यापुढे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे. यासाठी मोठा खर्च येणार असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

चोरीसाठी नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार ?