पुणे अपघात प्रकरणी २ पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन !

अन्वेषणात दिरंगाई केली आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा ठपका !

पुणे – येथील अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या २ पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. अन्वेषणात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलीस ठाण्यातील असून अपघात झाला, त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी कर्तव्यावर होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क केला नाही, तसेच रात्र पाळीवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता ? त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली ? याचीही चौकशी करण्यात येणार आहे.