विवाह सोहळ्यात वधू-वरांना उचलण्यासारख्या अयोग्य कृती केल्यास २५ सहस्र रुपयांचा दंड !

बागीलगे (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – विवाह सोहळ्यात अलीकडच्या काळात नवरा-नवरी एकमेकांना पुष्पहार घालत असतांना त्यांना उचलण्याची अयोग्य कृती केली जात आहे. विवाहविधी करतांना अशी कृती केल्यास संबंधितांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा स्तुत्य निर्णय बागीलगे (तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या गावात विविध कार्यक्रमांसाठी मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा लावण्यास बंदी आहे. (आज विवाह विधीत अनेक अयोग्य कृतींचा शिरकाव झाला असून वधू-वरांनी एकमेकांना माळ घालतांना त्यांना उचलण्याची अयोग्य कृती सगळीकडे होतांना दिसते. यामुळे विवाह कार्यातील पावित्र्य जपण्यासाठी योग्य तो निर्णय घेणार्‍या बागीलगे ग्रामस्थांचा निर्णय कौतुकास्पद आहे ! राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे योग्य कृती करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हिंदु संस्कृतीचे जतन निश्चित होईल ! – संपादक)

येथील विवाहसोहळे हे मुख्य करून रवळनाथ मंदिरासमोर असलेल्या रिकाम्या जागेत केले जातात. सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने केली जाते. भोजन हे स्थानिक आचारी सेवाभावी वृत्तीने करतात.