सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयांतील प्रश्न सोडवण्यासाठी विकास समिती स्थापन करणार !

सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

सांगली, २३ मे (वार्ता.) – सांगली आणि मिरज येथील शासकीय म्हणजे ‘सिव्हिल रुग्णालया’च्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी शासन यंत्रणेवर नागरिकांचा दबाव सिद्ध करण्यात यावा, रुग्णवाहक समिती स्थापन करणे, मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदने देणे, सांगली आणि मिरज येथील रुग्णालयांतील रेंगाळलेल्या कामांसाठी निधी उभा करणे आदी निर्णय २२ मे या दिवशी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आले.

‘सिव्हिल रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भागवत, पूर्वीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बिंदूसार पलंगे, श्री. उदय जगदाळे, डॉ. प्रसाद चिटणीस यांनी रुग्णालयाची सद्यःस्थिती आणि अडचणी यांविषयी सांगितले.

श्री. राजेंद्र भागवत म्हणाले की, सांगली आणि मिरज येथील रुग्णालये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडे येतात. त्यांची ही संलग्नता कायम ठेवली पाहिजे. या रुग्णालयाचा कणा म्हणजे येथे काम करणारे वैद्यकीय महाविद्यालयाचे पदवी-पदव्युत्तर विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी सुविधांनीयुक्त वसतिगृहे, स्वच्छतागृहे उभारण्यापासून आपल्याला प्रारंभ करावा लागेल. महाविद्यालयाशी संबंधित दोन्ही स्थानिक विकास समित्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल.


बैठकीतील मागण्या आणि निर्णय

१. जिल्हाधिकारी आणि अधिष्ठांतासमवेत ‘सिव्हिल’प्रश्नी बैठक घेणार

२. सांगली-मिरज येथील रुग्णालय आवारातच नवे विभाग व्हावेत

३. लोकप्रतिनिधींचा विकासनिधी ‘सिव्हिल’साठी राखीव ठेवावा

४. प्रस्ताविक बाल आणि महिला रुग्णालयांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा

५. सांगली-मिरज येथील रुग्णालयांचे विकास आराखडे सिद्ध करावेत

६. ‘सी.एस्.आर्.’ निधीसाठी पुणे आणि मुंबई येथील उद्योगांकडे पाठपुरावा करणार