निधीअभावी पुणे येथील ‘केळकर’ संग्रहालयाचा विस्तार रखडला !

पुणे – राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणजे पुण्याची ओळख ! या संग्रहालयाचा विकास आणि विस्तार यांसाठी काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने बावधन बुद्रुकमध्ये ६ एकर भूमी संग्रहालय व्यवस्थापनाला दिली होती; मात्र विस्तार आणि विकास यांचा हा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. या प्रकल्पासाठी अनुमाने ८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाने पाठपुरावा करूनही राज्य सरकारने प्रकल्पासाठी निधी संमत केला नाही. त्यामुळे प्रकल्प चालू होऊ शकला नाही.

१०० वर्षांहून अधिक जुन्या या संग्रहालयात २५ सहस्रांहून अधिक जुन्या आणि दुर्मिळ वस्तू आहेत. विविध प्रकारच्या मूर्तींपासून ते अनेक दिव्यांपर्यंतचा संग्रह या ठिकाणी आहे. संग्रहालयातील संग्रहित वस्तूंची संख्या दिवसागणिक वाढत असून ते प्रदर्शित करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळाचा पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांकडे यासंदर्भात पाठपुरावा चालू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. निधी मिळाल्यास संग्रहालयातील जुन्या आणि दुर्मिळ वस्तू आधुनिक स्वरूपात प्रदर्शित करू शकू. त्यामुळे अधिकाधिक पर्यटक नूतन प्रस्तावित संग्रहालयाला भेट देऊ शकतील, असा विश्वास रानडे यांनी व्यक्त केला. संग्रहालयदिनी दुर्मिळ तसेच वैविध्यपूर्ण माऊथ ऑर्गन आणि इतर वाद्य यांचे प्रदर्शन राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या वाद्य दालनामध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पहाता येणार आहे.

संपादकीय भूमिका :

निधीअभावी संग्रहालयाचा विस्तार रखडला जाणे लज्जास्पद आहे. आतातरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून संग्रहालयाच्या विस्तारासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा !