विनोबा भावे यांची ‘गीता प्रवचने’ नुकतीच वाचनात आली. त्यातील चौदाव्या अध्यायातील ‘गुणोत्कर्ष आणि गुणविस्तार’ या विषयीची मला भावलेली सूत्रे येथे दिली आहेत. ‘साधना करणार्या जिवांना निश्चितच याचा उपयोग होईल’, असे वाटते.
१. ‘देह आणि आत्मा वेगळे आहेत’, याची जाणीव सतत ठेवायला हवी !
आत्मा स्वयंपूर्ण असून त्याला लाभलेली गती ही स्वाभाविकपणे ऊर्ध्वगामी असते; मात्र आत्म्याच्या पायात देहाची बेडी असते. ती आत्म्याला खाली खेचते. त्यामुळे तो हलका होऊन वर जाऊ शकत नाही. या आत्म्याच्या पायातील देहाची बेडी आपण तोडू शकलो, तर फार मोठा आनंद प्राप्त होतो. देहाला दुःख झाले, वेदना झाल्या की, आपण दुःखी होतो. मग आपल्याला देहाच्या वेदनांनी दुःख होणार नाही. देहाची सुख-दुःखे ही आत्म्याची नाहीत. त्यांचा आत्म्याशी काडीइतकाही संबंध नाही; परंतु देह आत्म्यावर सत्ता गाजवत असतो. देहाची आत्म्यावरील सत्ता दूर करायला हवी, म्हणजेच ‘देह आणि आत्मा वेगळे आहेत’, याची जाणीव सतत ठेवायला हवी.
‘देहाला आत्म्यापासून वेगळे समजणे आणि वेगळे करणे’, हे निग्रहाचे (संकल्पाचे) काम आहे. त्यासाठी वैराग्यही हवे. ‘वैराग्य’ म्हणजे एक प्रकारे निग्रह!
२. देहापासून निग्रहाने आत्मा वेगळा करायचा मार्ग म्हणजे तम-रज-सत्त्व हे तिन्ही गुण जिंकून घेणे !
सर्व चराचरांची जी प्रकृती असते, तिच्यात सत्त्व, रजआणि तम हे तीन गुण असतात. कुठे अल्प, कुठे अधिक एवढाच भेद असतो. या तिन्हींपासून आपण जेव्हा आत्म्याला वेगळे करू, तेव्हाच देहापासून आत्म्याला वेगळे करता येईल. देहापासून निग्रहाने आत्मा वेगळा करायचा मार्ग, म्हणजे हे तिन्ही गुण जिंकून घेणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. आता या तिन्ही गुणांवर नियंत्रण कसे मिळवायचे ? त्यासाठी काय करायचे ? ते पाहूया.
२ अ. तमोगुणावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय : तमोगुणाचा मुख्य परिणाम आळस आहे. त्यातूनच पुढे झोप आणि प्रमाद या गोष्टी चिकटतात. या तिन्ही गोष्टी जिंकता आल्या, तर ‘तमोगुण जिंकला’, असे म्हणता येईल.
२ अ १. आळस : आळस, झोप आणि प्रमाद या तीन प्रकारांतील आळस ही एक फारच भयंकर गोष्ट आहे. या आळसामुळे उत्तम माणसेही बिघडून जातात. समाजातील सर्व सुखशांतीचा नायनाट करणारा हा रिपू, म्हणजे शत्रू आहे. लहान-थोर आणि वृद्ध या सर्वांना हा बिघडवतो. आळसास संधी न देणे, यासाठी नेहमी दक्ष राहिले पाहिजे. शरीर आळसावले की, मन आणि बुद्धी दोन्हीही आळसावतात.
२ अ १ अ. आळस जिंकण्याचा उपाय : मुख्य दुःख आळसामुळेच असते. आवश्यक तेवढे सर्व सुख सहज मिळवण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे ‘सर्वांनी आळस सोडून श्रम करावयास सिद्ध होणे’ हा होय. जर सर्वांनी शारीरिक श्रम करण्याचा निश्चय केला, तर दुःख दूर होईल. प्रत्येकाने आळस सोडलाच पाहिजे. आळस सोडायचा, म्हणजे शारीरिक परिश्रम करायचे. आळस जिंकण्याचा हाच उपाय आहे. हा उपाय कार्यवाहीत आणला नाही, तर त्याची शिक्षा भोगावी लागते. रोगाच्या किंवा अन्य कोणत्या तरी रूपाने शिक्षा भोगणे सुटत नाही.
भगवंताने ज्या अर्थी आम्हाला शरीर दिलेले आहे, त्याअर्थी श्रम हे करावे लागणारच. श्रमांसाठी दिलेला वेळ किंवा श्रम करण्यात गेलेला वेळ फुकट जात नाही. त्याचा लाभ होतोच. आरोग्य उत्तम लाभते. बुद्धी सतेज, तीव्र आणि शुद्ध होते.
२ अ २. झोप : दुसरी गोष्ट म्हणजे झोप जिंकणे. झोप ही वस्तुतः पवित्र गोष्ट आहे. झोप खोल असावी. विहीर खोल असेल, तर पाणी अधिक स्वच्छ आणि मधुर असते. त्याप्रमाणे झोप जरी थोडी असली; पण खोल असली, तर उत्तम कार्य होते. लांबलचक झोप लाभदायी ठरतेच, असे नाही. झोप ही विश्रांतीसाठी असते; परंतु झोपेतही नाना स्वप्ने आणि विचार छातीवर बसतील, तर कुठली विश्रांती ? ‘खरी झोप ही गाढ आणि निःस्वप्न असते.’ अशी सुंदर झोप लागावी; म्हणून दिवसा चांगली पूर्वसिद्धता, म्हणजे परिश्रम केले पाहिजेत.
२ अ २ अ. झोप जिंकण्याचा उपाय : ‘गाढ झोप आणि खोल झोप कशी मिळावी ?’, यासाठी जो उपाय आळसावर सांगितला, तोच उपाय येथेही लागू होतो. देह सारखा वापरला पाहिजे. शरीर थकून गेले पाहिजे, म्हणजे मग अंथरुणावर पडताच मनुष्याला शांत आणि गाढ झोप लागेल. ज्याला अशा प्रकारची झोप लागते, तो महाभाग्यवंतच म्हणावा लागेल.
पुष्कळ वेळ झोपेत गेला की, अनावधान उत्पन्न होते. फार झोप येण्याने पुन्हा आळस उद्भवतो आणि आळसाने विसर पडतो. ‘विस्मरण’ ही परमार्थाचा नाश करणारी वस्तू आहे. व्यवहारातही विस्मरणाने हानी होते. परमार्थ असो वा प्रपंच दोन्हीकडे विस्मरण हानीकारकच आहे. विस्मरण हा मोठा रोग असून त्याने बुद्धीला कीड लागते आणि जीवन पोखरले जाते.
२ अ ३. मनाचा आळस हे विस्मरणाचे मोठे कारण आहे. याला जिंकण्यासाठी आळस आणि निद्रा जिंकून घ्यावे. शारीरिक परिश्रम करावेत आणि सतत सावध रहावे.
(क्रमश : उद्याच्या दैनिकात)
– श्री. प्रकाश मराठे (वय ७९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/796659.html