घटस्फोट !

प्रतिकात्मक छायाचित्र

शहरात रहाणार्‍या जोडप्यांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. कार्यालयात उच्च पदावर असतांना इतरांकडून मिळणारा मानसन्मान, आधुनिक राहणीमानाचा आणि पदाचा काही प्रमाणात अहंकार निर्माण होऊ लागतो. घरी जोडीदाराकडूनही अशाच सन्मानाची अपेक्षा केली जाते. तो तितक्या प्रमाणात न मिळाल्यास खटके उडतात, त्याचे रूपांतर वादात होते. कधी कधी हे वाद विकोपाला जातात. सातत्याने असे प्रसंग घडू लागल्यास जोडीदारासमवेत रहाणे नकोसे वाटू लागते. माघार घेण्याची सवय नसल्याने वितुष्ट वाढत जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचते. नोकरीच्या निमित्ताने कार्यालयातील सहकारी, तसेच कार्यालयाशी संबंधित व्यक्ती यांच्याशी सातत्याने संपर्क येत असल्याने काही वेळा पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात, ज्यामुळे जोडीदारांत वाद होऊन नात्यात दरी निर्माण होते. काही वेळा विवाहाआधी घडलेले प्रसंग, आजार किंवा जीवनातील एखादी गंभीर घटना याविषयी समोरच्यांशी मोकळेपणाने बोलले जात नाही. या गोष्टी विवाहानंतर लक्षात आल्यावर विश्वासघाताची भावना मनात निर्माण होऊन नात्यातील जवळीकता लोप पावू लागते. ज्याचे पर्यावसान पुढे वादात आणि भांडणांत होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाते. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सरकाकडून प्रोत्साहन आणि संरक्षण दिले जात असले, तरी विवाहानंतर अचानक पालटलेले राहणीमान, तेथील चालीरीती, खाण्या-पिण्याच्या सवयी यांचा स्वीकार करतांना संघर्ष होतो. याखेरीज पती-पत्नींची मानसिक स्थिती, त्यांच्या सवयी, वागण्या-बोलण्याच्या पद्धती, परस्परांच्या नातेवाइकांशी असलेली वर्तणूक या गोष्टी काही प्रमाणात घटस्फोटास कारणीभूत असतात. जोडीदाराला असलेली व्यसने, त्याचा मित्रवर्ग या गोष्टीही लग्नाआधी ज्ञात नसल्यास गंभीर वादास कारणीभूत ठरतात.

पती-पत्नीचे नाते बहरण्यासाठी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारणे, परस्परांशी मनमोकळेपणाने बोलणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, आवश्यक तिथे तडजोड करणे, माघार घेणे, परस्परांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणे या गोष्टी प्राथमिक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असतात. स्वतःचा अहंकार जपत राहिल्यास लहान लहान प्रकरणात विनाकारण मनात क्लेश निर्माण होऊन नात्यातील प्रेम लोप पावू लागते. आताच्या पिढीवर अनैतिकता पसरवणारे चित्रपट, कुटुंबव्यवस्थेला छेद देणार्‍या मालिका, वासनांधतेने भरलेल्या वेब सिरीज यांचा प्रभाव अधिक आहे. विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यांना तुच्छ लेखणार्‍या या चित्रपट-मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध, गृहकलह, घटस्फोट यांसारखे विषय चवीने चघळले जातात. भारतीय कुटुंबव्यवस्था टिकवायची असेल, तर या व्यवस्थेचे लाभ महाविद्यालयीन शिक्षणातून शिकवले जायला हवेत !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.