संपादकीय : ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती !

पुणे येथे झालेल्या अपघातानंतरची दृश्ये

राज्यभरात चौफेर टीका झाल्यावर आणि थेट गृहमंत्र्यांनीच लक्ष घातल्यावर २ दिवस पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना मुक्तहस्त देणार्‍या पोलिसांमधील ‘खरे’ पोलीस जागृत झाले आणि त्यांनी विशाल अग्रवाल यांना अटक केली. वेदांत अग्रवालला या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी ज्या प्रकारे ‘विशेष’ वागणूक दिली, तशीच वागणूक मुंबई पोलिसांनी वर्ष २००२ मध्ये अभिनेता सलमान खान याला दिली होती. ज्या प्रकारे विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मद्यपान करून गाडी चालवली अगदी त्याच प्रकारचा आरोप सलमान खानवरही होता. गाडी अपघातग्रस्त झाल्यावर सलमानने ‘गाडी मी चालवत नसून माझा चालक चालवत होता’, असे सांगितले; त्याच प्रकारे वेदांतनेही ‘गाडी मी चालवत नसून माझा चालक चालवत होता’, असे सांगितले. सलमान खानच्या मालकीच्या गाडीचा अपघात होऊन १ जण मृत्यूमुखी पडला आणि ५ जण गंभीर घायाळ झाले. त्या प्रकरणात सलमानला प्रथम खालच्या न्यायालयात शिक्षा झाली; मात्र मुंबई उच्च न्यायालयात जानेवारी २०१६ मध्ये पुरेशा पुराव्यांच्या अभावी त्याला दोषमुक्त करण्यात आले. वाहन अपघातांतील बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांचे अन्वेषणच अशा प्रकारे असते की, त्याचा लाभ संशयितांनाच मिळतो. पुण्याच्या प्रकरणातही सलमान खानच्याच ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती झाली असून ‘या प्रकरणात प्रत्यक्ष खटला चालणार कधी ?’ आणि ‘मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोस्ट आणि अनिस आहुदिया यांना न्याय मिळणार का ?’, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह ?

१९ मे या दिवशी पहाटे ३ वाजता पुण्यातील कल्याणनगर परिसरात वेदांत अग्रवालच्या वाहनाची दोघांना धडक बसून ते ठार झाले. धडक मारल्यावर परिसरातील नागरिकांनी वेदांतला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. म्हणजे या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध असतांनाही वेदांतला केवळ १५ घंट्यांत जामीन मिळाला. ज्या घटनेत दोघे मृत्यूमुखी पडले, त्या प्रकरणात अन्य कुठलेही अन्वेषण न होता तात्काळ जामीन मिळाल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली. अग्रवाल यांच्या मुलाने चालवलेली ‘पोर्शे’ गाडी केवळ विनाक्रमांकाची नव्हती, तर ती विनानोंदणीच रस्त्यावर धावत होती. अन्य वेळी साधे शिरस्त्राण नसेल, गाडीची ‘नंबरप्लेट’ चुकीची असेल तर आणि अन्य कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी नागरिकांना सहस्रो रुपयांचा दंड ठोठावणार्‍या पोलिसांनी मार्चपासून ही गाडी रस्त्यावर कशी काय फिरू दिली ? याचे उत्तर निश्चित नागरिकांना मिळाले पाहिजे.

आरोपीचे वडील (विशाल अग्रवाल )

या प्रकरणात पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आली. ससून रुग्णालयात पडताळणी केल्यावर त्याला आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीड वाजता येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. येथे त्यांना ‘पिझ्झा’ आणि ‘बर्गर’ देण्यात आले, असे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. यावरून पोलीस विशाल अग्रवाल यांच्या मुलावर किती ‘मेहरबान’ होते, हेही लक्षात येते. मुलगा अल्पवयीन असेल, तर आता नवीन कायद्यानुसार वडिलांवरही गुन्हा नोंद होतो. पहिल्या २ दिवसांत अग्रवाल यांच्यावर ना गुन्हा नोंद झाला, ना अन्य कोणती कारवाई झाली. त्याही पुढे जाऊन अग्रवाल यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यावर अग्रवाल पसार होते. ते पसार झाले कि होऊ दिले ? हा प्रश्नही पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी उपस्थित होतो. एखादा व्यक्ती श्रीमंत असेल, तर अन्वेषण कशा प्रकारे भरकटू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

या प्रकरणात एका आमदारानेही पोलीस ठाण्यात पहाटे ४ वाजता भेट दिल्याची स्वीकृती दिली आहे. ‘विशाल अग्रवाल यांचा दूरभाष आल्याने आणि ही घटना माझ्या मतदारसंघात येत असल्याने मी गेलो’, असे या आमदाराने सांगितले. जनतेच्या कामासाठी, त्यांच्या अडचणीच्या काळात अथवा अन्य विकासकामांसाठी या आमदारांनी अशी तत्परता दाखवल्याचे ऐकिवात नाही. यावरून एखाद्याच्या मागे ‘धन’ उभे असेल, तर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अन्य अनेक यंत्रणा कशा प्रकारे तत्परतेने काम करतात, हेच समोर येते. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने त्याच्या साक्षीत ‘मी अल्पवयीन असून माझ्याकडे गाडी चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) नाही आणि मी मद्यपान करतो, हे ठाऊक असूनही माझ्या वडिलांनी मला गाडी चालवण्यास दिली’, असे सांगितले आहे. यावरून अग्रवाल यांच्यासारख्यांची मुजोरी लक्षात येते. आपल्या मुलाला गाडी येत नसतांना काही झाल्यावर ‘मी पैशाच्या बळावर त्याला सोडवून आणेन’, हा जो अहंकार आहे, त्याला योग्य वेळीच प्रशासनाने वेसण घालण्याची आवश्यकता आहे.

पुण्यात फोफावलेली ‘अवैध पब’ची विकृती !

या घटनेत पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल ‘काझी’चे मालक आणि त्यांचा व्यवस्थापक यांनाही अटक केली आहे. एकेकाळी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे सध्या कोयता गँग, गुंडगिरी आणि अनेक अवैध व्यवसाय यांमुळे अपकीर्त होत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात ‘आयटी इंडस्ट्री’ वाढल्यावर रात्रीच्या ‘पब विकृती’मध्येही वाढ झाली. यात साहजिकच रात्री उशिरापर्यंत मद्यपान, ‘रेव्ह पार्टी’ ‘अमली पदार्थांची रेलचेल’ या गोष्टी आल्याच ! या गोष्टींना आळा असता, तर कदाचित् अग्रवाल यांचा मुलगा पार्टी करण्यासाठी इथे आलाच नसता आणि पुढची घटनाही घडली नसती. अश्विनी कोस्ट आणि अनिस आहुदिया हे दोघेही रात्री उशिरा ‘पार्टी’ करूनच परत येत होते, हेही इथे नमूद करण्यासारखे आहे. यामुळे तरुण पिढी कशा प्रकारे भरकटत आहे आणि पोलीस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने सर्व गुन्हेगारी वृत्तींच्या घटनांना पुण्यात ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी स्थिती असल्यासारखे आहे.

‘हिट अँड रन’ प्रकरणात सलमान खानही १४ वर्षांनी निर्दाेष सुटला. त्याप्रमाणे या प्रकरणातही पुणे पोलिसांनी ज्या प्रकारे अन्वेषण केले, ते पहाता हे प्रकरण न्यायालयात उभे राहिल्यावर पुणे पोलिसांचे पुरावे न्यायालयात टिकणार का ? आणि मृतांच्या नातेवाइकांना न्याय मिळणार का ? यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या व्यक्तींकडे पैसा आहे, तसेच ज्यांचे राजकीय संबंध असतात, त्यांना न्याय मिळतो आणि जे गरीब असतात, त्यांच्यासाठी ‘न्याय’ नसतो, असेच दुर्दैवाने येथे नमूद करावे लागेल !

मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का ?

‘हिट अँड रन’ प्रकरणात सलमान खानही १४ वर्षांनी निर्दाेष सुटला. त्याप्रमाणे या प्रकरणातही पुणे पोलिसांनी ज्या प्रकारे अन्वेषण केले, ते पहाता हे प्रकरण न्यायालयात उभे राहिल्यावर पुणे पोलिसांचे पुरावे न्यायालयात टिकणार का ? आणि मृतांच्या नातेवाइकांना न्याय मिळणार का ? यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या व्यक्तींकडे पैसा आहे, तसेच ज्यांचे राजकीय संबंध असतात, त्यांना न्याय मिळतो आणि जे गरीब असतात, त्यांच्यासाठी ‘न्याय’ नसतो, असेच दुर्दैवाने येथे नमूद करावे लागेल !

अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्‍या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !