|
बरेली / सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन मुसलमान मुलींनी त्यांच्या हिंदु प्रियकराशी विवाह करण्यासाठी स्वेच्छेने हिंदु धर्मात घरवापसी (घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणे) केली. त्या दोघींना त्यांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबियांकडून विरोध होता. त्यामुळे दोघींनी त्यांच्या प्रियकरांसमवेत पळून जाऊन विवाह केला. बिजनौरची निशा आता राधिका झाली असून तिचा विवाह राजेश कुमार नावाच्या तरुणाशी झाला आहे, तर सीतापूर जिल्ह्यातील निदा बानो आता निधी म्हणून ओळखली जाईल. निधीने रचित कुमारशी विवाह केला. १८ मे या दिवशी झालेल्या या विवाहांमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांना साहाय्य केले. वेदमंत्रांच्या उच्चारात, तसेच ‘जय श्रीराम’च्या घोषात हे विवाह पार पडले.
निशा उपाख्य राधिका हिची कथा !
बरेलीतील निशा ही तिचा प्रियकर राजेशसमवेत येथील अगत्स्य मुनी आश्रमात पोचली. तिने स्वतःच्या प्रौढत्वाचा पुरावा पंडित के.के. शंखधर यांच्याकडे सोपवला आणि राजेशशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रतिज्ञापत्रे आणि इतर कायदेशीर कागदपत्रे पडताळून वैदिक विधींनुसार त्यांचा विवाह झाला. निशा आणि राजेश दोघेही बिजनौर जिल्ह्यातील शेओहरा येथील रहिवासी आहेत. निशाने सांगितले की, राजेश तिच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी तिच्या गावी यायचा. अनुमाने ५ वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. निशाच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन विवाह केला.
पंडित शंखधर यांनी केला मुसलमानांचा रोखठोक प्रतिवाद !
विवाहाचे पौरोहित्य करणार्या पंडित के.के. शंखधर यांनी सांगितले की, विवाहानंतर बरेलीतील आला हजरतशी संबंधित काही लोकांकडून त्यांना धमकावण्यात आले. त्यांच्या विरोधात मुसलमान मुलींचे बेकायदेशीर धर्मांतर केल्याचा आरोपही करण्यात आला. पंडित शंखधर यांनी सांगितले की, विवाह झालेल्या सर्व मुली प्रौढ आहेत आणि घरवापसी करणे, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. प्रशासन केवळ धमक्या देणार्यांवर कठोर कारवाई तर करेलच; पण त्यांच्या सुरक्षेचाही गांभीर्याने विचार करेल, अशी मी अपेक्षा करतो.
निदा बानो उपाख्य निधी हिची कथा !
घरवापसीचे दुसरे प्रकरण उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील आहे. येथे निदा बानो नावाची मुलगी घरवापसी करत निधी बनली असून रचित कुमारशी विवाह केला. ‘राष्ट्रीय हिंदू शेर सेना’ या संघटनेच्या हिंदुत्वनिष्ठांनी या विवाहासाठी दोघांना साहाय्य केले. संघटनेचे अध्यक्ष ‘विकास हिंदू’ यांनी यासंदर्भात सांगितले की, २० वर्षीय निदा बानो आणि रचित यांचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. निदा ही मूळची सीतापूर जिल्ह्यातील इमालिया गावातील रहिवासी आहे. २२ वर्षीय रचित कुमार हा निदाचा शेजारी रहाणारा आहे. दोघेही एकाच शाळेत शिकले. निदाचे कुटुंब या विवाहासाठी सिद्ध नव्हते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती आल्यानंतर निदाच्या भावाने बहिणीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचाही प्रयत्न केला. तिच्या घरातील लोकांनी रचितच्या घरी जाऊन धमक्या दिल्या होत्या.
नवविवाहित निधी या वेळी म्हणाली की, मी विवाहामुळे फार आनंदी आहे. ‘तिहेरी तलाक’ आणि ‘हलाला’ यांसारख्या गोष्टींना मी घाबरायचे. (हलाला म्हणजे घटस्फोटित पतीशी पुनर्विवाह करण्यासाठी पत्नीला परपुरुषासमवेत एकदा लैंगिक संबंध ठेवण्याची इस्लामी प्रथा.)
संपादकीय भूमिकाएरव्ही हिंदूंना ‘प्रेमाला धर्मबंधनात अडकवू नका’, असा उपदेशाचा डोस पाजणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता हिंदु तरुणांशी विवाह करण्यास आडकाठी करणार्या मुसलमान तरुणींच्या कुटुंबियांना उपदेशाचे डोस का पाजत नाहीत ? |