Khalistani Terriorist Threatens PM Modi : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडून पंतप्रधान मोदी यांना ठार मारण्याची धमकी !

  • पंजाबमधील तरुण आणि शेतकरी यांना दिली चिथावणी

  • ८३ लाख रुपयांचे घोषित केले बक्षिस

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू (डावीकडे)

अमृतसर (पंजाब) – ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे. मोदी यांची हत्या करणार्‍याला १ लाख डॉलर (८३ लाख रुपये) देण्याची घोषणाही त्याने केली आहे.

पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात तो म्हणतो की, पंजाबमधील तरुण आणि शेतकरी यांचे मारेकरी असलेले नरेंद्र मोदी पंजाबमध्ये येत आहेत. लक्षात ठेवा, २१ मे १९९१ या दिवशी राजीव गांधी यांना बाँबस्फोटाद्वारे संपवले होते. पंतप्रधान मोदी यांना पंजाबमध्येच उत्तर द्यावे लागेल. सर्व रस्ते आणि विमानतळाचे मार्ग बुलडोझर आणि ट्रॅक्टर यांद्वारे अडवावेत. मोदी यांना येथे बोलू दिले जाणार नाही. हा पंजाब आहे. ज्यांना भारतापासून स्वातंत्र्य हवे आहे, हे नरेंद्र मोदी यांना सांगावे लागेल. शत्रू घरात येत आहे, घरात उत्तर मिळेल.

नरेंद्र मोदी २३ आणि २४ मे या दिवशी पंजाबमध्ये प्रचारसभा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ आणि २४ मे या २ दिवसांत पंजाबमध्ये ३ प्रचारसभांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. पंजाबमधील पतियाळा, जालंधर आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघांत या सभा होणार आहेत.

संपादकीय भूमिका

अमेरिका आणि कॅनडा देशांचे नागरिकत्व स्वीकारलेला पन्नू तेथे बसून भारताच्या पंतप्रधानांना ठार मारण्याची जाहीर धमकी देतो आणि हे दोन्ही देश त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत; मात्र त्याच पन्नूला ठार मारण्याचा कथित कट रचल्यावरून भारतीय नागरिकांना अमेरिका अटक करते, हा अमेरिकेचा दुटप्पीपणा आहे ! अमेरिका भारताचा कधीही मित्र होऊ शकत नाही !