५ मिनिटांत २२ मीटर वर उचलला जाणार पूल

रामेश्वरम् (तमिळनाडू) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आशियातील पहिल्या ‘व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन’ रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. समुद्रावर असणार्या या पुलाचे नाव ‘पंबन ब्रिज’ ठेवण्यात आले आहे. हा पूल २.०८ कि.मी. लांब आहे. त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये केली. हा पूल रामेश्वरम् (पंबन बेट) ते मंडपम् यांना जोडतो. स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या या पुलावर पॉलिसिलॉक्सेनचा लेप लावण्यात आला आहे, जो गंज आणि समुद्राचे खारे पाणी यांच्यापासून त्याचे संरक्षण करील. जुना पूल २०२२ मध्ये गंज लागल्यामुळे बंद करण्यात आला होता. यानंतर रामेश्वरम् आणि मंडपम् यांच्यामधील रेल्वे संपर्क तुटला.
‘व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन’ पूल कसा कार्य करणार ?
जेव्हा मोठ्या नौकांना येथून जावे लागते, तेव्हा ‘व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन’ पुलाचा मध्यवर्ती भाग वर उचलला जातो. ही प्रक्रिया इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीवर काम करते. यामुळे पुलाचा मध्यभाग केवळ ५ मिनिटांत २२ मीटरपर्यंत वर उचलला जातो. यासाठी केवळ एकाच व्यक्तीची आवश्यकता असेल. जुना पूल कामगारांकडून उघडण्यात येत होता आणि त्यासाठी १४ लोकांची आवश्यकता होती.