
कोल्हापूर, ५ एप्रिल (वार्ता.) – भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ (‘जितो’)च्या वतीने जगभरामध्ये १०८ देश आणि भारतामध्ये ६ सहस्र ठिकाणी ‘नवकार महामंत्र’ दिवसाचे कार्यक्रम केले आहेत. कोल्हापूर शहरात हा कार्यक्रम सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत महासैनिक दरबार हॉल, बावडा येथे आयोजित केला आहे, अशी माहिती ‘जीतो कोल्हापूर’चे अध्यक्ष रवि संघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी अनिल पाटील, जितेंद्र राठोड, रवींद्र देवमोरे, प्रतीक ओसवाल, माया राठोड यांसह अन्य उपस्थित होते.
१. संपूर्ण जगामध्ये युद्ध संघर्ष, आतंकवाद, दुराचार, हिंसाचार वाढत असतांना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि सुख-शांती आनंद पसरावा, या उद्देशाने ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन-जितो अपेक्स’ या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज कोठारी यांनी हा संकल्प केला आहे. या कार्यक्रमांमध्ये १ कोटी ८ लाख लोक सहभागी होतील, असा संकल्प करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील कार्यक्रमासाठी ५ सहस्र लोक येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
२. ‘जितो’ ही संघटना शिक्षण, सेवा आणि आर्थिक सक्षमीकरण यांवर कार्य करते. जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तीशाली मंत्र मानला जातो. या मंत्रामध्ये विश्वातील सर्व अरिहंत साधू-उपाध्याय यांना नमन केले जाते. या मंत्राने आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते.
३. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील आणि इचलकरंजी जवळील कर्नाटक भागातील सर्व जैन श्रावक है एकत्रितपणे जैन मंदिर आणि तीर्थक्षेत्र अन् विविध ठिकाणी एकत्रित नवकार महामंत्र पठण करतील. या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३० वाजता देहली येथे करणार आहेत.
बेळगाव येथील महावीर भवन येथे कार्यक्रम !

बेळगाव (कर्नाटक) – जितो आणि संपूर्ण जैन समुदायाच्या सहकार्याने साजरा केला जाणारा हा कार्यक्रम बेळगाव येथील महावीर भवन येथे सकाळी ७.३० वाजता साजरा केला जात आहे. जागतिक योग दिन जगभरात ज्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याच पद्धतीने हा दिन साजरा केला जाणार आहे.

हा नमोकार दिवस उत्सव केवळ जैन समुदायापुरता मर्यादित नाही, तर समुदायातील सर्व सदस्यांनी या उत्सवात सहभागी होऊन ‘विश्व नमोकार दिवस उत्सव’ यशस्वी करावा, असे जितोच्या बेळगाव विभागाचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल आणि सरचिटणीस अभय आदिमनी यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.