म्हापसा येथे अमली पदार्थांसह नायजेरियाच्या तरुणीला अटक

म्हापसा – गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने धाड घालून एका नायजेरियाच्या तरुणीला १५० ग्रॅम ‘ॲम्फेटामाइन डब्ल्यू’ या अमली पदार्थासह अटक केली. या अमली पदार्थाची किंमत १५ लाख रुपये आहे. पथकाने तिच्याकडून १०० ग्रॅम गांजाही जप्त केला आहे. फेथ चिमेरी (वय २४ वर्षे) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी बसने बेंगळुरूहून गोव्यातील गिरी, म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील बसथांब्यावर उतरली. येथे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थविरोधी पथकाने तिला पकडून तिची झडती घेतली. तिच्या प्राथमिक चौकशीत अमली पदार्थाची विक्री आणि वितरण यांसाठी बेंगळुरूहून गोव्यात आल्याचे उघड झाले. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक श्री. अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

चालू वर्षांत ३ कोटी ७७ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अलीकडेच बोरी, फोंडा येथे ‘हायड्रोपोनिक’ गांजाच्या प्रयोगशाळेवर धाड टाकून तेथे चालू असलेल्या कारवाया उघड केल्या होत्या. या ठिकाणी एका स्थानिक तरुणाला गांजाची लागवड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गोव्यातील अमली पदार्थांच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने चालू वर्षात ३ कोटी ७७ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत आणि स्थानिक अन् विदेशी नागरिक यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका 

अमली पदार्थांच्या संदर्भातील वाढत्या घटनांमुळे गोव्याची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती होत असून ती रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस कृती कार्यक्रम आखणे आवश्यक आहे !