‘१३.१.२०२४ या दिवशी दादर, मुंबई येथे सुराज्य अभियानांतर्गत एका सत्संगाचे आयोजन केले होते. तेव्हा मला झालेले आध्यात्मिक त्रास आणि सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये यांची माहिती पुढे दिली आहे.
१. अनुभवलेले त्रास
अ. दादर येथील सत्संगाच्या आदल्या दिवशी रात्री मला वाईट स्वप्न पडले. त्यामुळे माझ्यावर अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण येऊन माझे अंग जड झाले. माझ्या मनात ‘घरातील कामे करता येणार नाहीत. त्यामुळे सत्संगाला जाऊ नये’, असा नकारात्मक विचार आला.
आ. भाजी चिरतांना माझ्या बोटाला सुरी लागली आणि मला डाव्या हाताने काम करणे कठीण झाले.
इ. मी साहित्य विकत आणण्यासाठी दुचाकीने बाहेर गेल्यावर दुचाकी तारेत अडकली; पण देवाच्या कृपेने गाडी लगेच थांबवता आली आणि अनर्थ टळला.
ई. पहिल्या दिवशी सत्संगात मला पुष्कळ खोकला येत होता. माझ्या डोक्यावर दाब जाणवून श्वास घ्यायला त्रास होत होता. ‘कुणीतरी माझा गळा दाबत आहे’, असे वाटले. तसेच माझे डोळे, हात, पाय आणि संपूर्ण शरीर जड झाले होते.
उ. सत्संगाच्या दुसर्या दिवशी मी ‘शून्य’ हा जप चालू केल्यावर माझी शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता वाढली. त्या वेळी ‘तिथून उठून निघून जावे’, असे मला वाटले. मी दात-ओठ खात राग व्यक्त करत होते. मला ताण आल्याने कागदावर लिहिलेले लक्षात येत नव्हते.
२. देवाने सूक्ष्मातील दाखवलेली दृश्ये
अ. मला सत्संगाच्या खोलीत सूर्याचा तेजस्वी गोळा दिसत होता. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर फळ्यावर लिहून विषय समजावून सांगत होते. त्या फळ्याचा रंग सोनेरी दिसत होता आणि त्यातून दैवी किरण बाहेर पडत होते. त्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्ती नष्ट होऊन सर्वत्र चैतन्य पसरत होते.
आ. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या ठिकाणी चैतन्याचा गोळा दिसत होता. त्या गोळ्यातून ३ नामजप बाहेर पडत होते. त्यांचे केस आणि डोके यांमधून ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा जप बाहेर पडत होता. त्यांच्या कपाळावर शिवपिंडीचे दर्शन झाले आणि तिथे ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप दिसत होता. त्यांच्या हृदयात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले आणि तिथे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप दिसत होता.
इ. सत्संगाची खोली पुष्कळ व्यापक झाली होती. ‘आम्ही वेगळ्याच लोकात बसलो आहोत’, असे मला जाणवत होते.
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (१४.१.२०२४)
|