बीड – १३ मेच्या रात्री ‘कमळाला मतदान का केले ?’, असा जाब विचारत येथील अशोक राऊतमारे यांच्या घरावर ६ जणांनी दगडफेक करून तलवारीने आक्रमण केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत ५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. घटनेनंतर बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी अशोक राऊतमारे यांच्या घरी भेट देत त्यांची विचारपूस केली.
अनिल पाटील याने राऊतमारे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातील २ सहस्र रुपये काढून घेतले. ‘मुलांसह तुला जिवे मारतो, तुझे घर जाळतो’, अशी धमकी देत राऊतमारे यांना मारहाण करत त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी आक्रमणकर्त्यांना राऊतमारे यांनी अडवले असता अनिल पाटील याने अशोक राऊतमारे यांच्यावर तलवारीने वार केला. त्याच वेळी शेजारील कुलदीप जाधव यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्या कानाला तलवार लागली आणि ते घायाळ झाले. राऊतमारे यांच्या साहाय्याला तिघेजण आल्याने आक्रमणकर्ते पसार झाले. जातांना त्यांनी घरावर जोरदार दगडफेक केली.
संपादकीय भूमिकापोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय ! |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आक्रमण घडवून आणले ! – विश्वजित देशपांडे, प्रदेशाध्यक्ष, परशुराम सेवा संघ
बीड जिल्ह्यात राऊतमारे नावाच्या ब्राह्मण कुटुंबावर लाठ्या-काठ्या आणि तलवारी घेऊन आक्रमण करण्यात आले. ‘घर फोडले, गाडी फोडली. कारण काय, तर कमळाला मतदान केले, तुतारीला मतदान का केले नाही ? शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आक्रमण घडवून आणले’, असा माझा थेट आरोप आहे, असे राऊतमारे यांनी सांगितले. राऊतमारे यांनी पुढे सांगितले की, जेव्हा ब्राह्मण मतदार यांच्या पाठीशी रहात नाहीत, असे लक्षात आले, तेव्हा यांनी गुंडगिरी चालू केली आहे. त्यामुळे शरद पवारांसह संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही निषेध करत आहोत. कुणी कुणाला मतदान करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. तुम्ही अमुक पक्षाला मतदान करा; अन्यथा तुमचे घर फोडू, तुम्हाला मारू, संपत्तीची हानी करू या भूमिकेला लोकशाहीत स्थान आहे का ? जर शरद पवारांचा पक्ष लोकशाही मानत असेल, तर शरद पवार ब्राह्मण समाजाची क्षमा (माफी) मागणार का ? त्यांच्या पक्षाचे प्रदेश स्तरावरचे नेते क्षमा मागणार का ?
या घटनेकडे गांभीर्याने पहायला हवे. याच बीड जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वी ‘३ मिनिटांत ब्राह्मण संपवू’, अशी भाषा केली गेली. नेहमीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. आरोपीला अटक झाली आणि तो जामिनावर बाहेर आला. याच्या मागे कोण लोक होते ? हे सर्वश्रुत आहेच. भविष्यात या घटना अधिक वाढू शकतात; कारण यांना ब्राह्मण संपवायचा आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा त्रास दिला जात आहे. याला आवर घालण्यासाठी आपल्यालासुद्धा कंबर कसली पाहिजे. संघटित लढा द्यावाच लागेल, तरच आपल्या लेकरा-बाळांना सुरक्षित जगता येईल.