रंकाळा तलाव सुशोभिकरणाच्या कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून अचानक पडताळणी !
कोल्हापूर – रंकाळा तलाव येथे चालू असलेल्या कामाची १५ मे या दिवशी दुपारी महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अचानक जाऊन पडताळणी केली. या वेळी त्यांना ठेकेदाराकडून जे काम करण्यात येत आहे, ते पूर्ण क्षमतेने चालू नसल्याचे निदर्शनास आले. त्याचसमवेत कामावर ठेकेदाराचे कुणीही कामगार उपस्थित नव्हते आणि कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी कामामध्ये प्रगती नसल्याने शहर अभियंता यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
रंकाळा तलाव कोल्हापुरातील नागरिक आणि पर्यटक यांसाठी विरंगुळ्याचे अन् जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महापालिका आणि राज्यशासना यांच्या वतीने तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून रंकाळा तलावाचे संवर्धन अन् सुशोभिकरण करण्यात येत आहे. सदरचे काम संथगतीने चालू असल्याविषयी नागरिकांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. याची नोंद घेत प्रशासकांनी पहाणी केली असता त्यांना वरील प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून त्याला दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या आहेत.