रुग्णांना समजून घेऊन त्यांना आधार देणार्‍या वैद्या (कु.) अपर्णा महांगडे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांची सुश्री (कु.) पूनम चौधरी यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वैद्या (कु.) अपर्णा महांगडे

१. आसक्ती अल्प असणे

अपर्णाताईंना कसलीही अपेक्षा नाही. त्यांचा स्वभाव सरळ आहे. दागिने, कपडे किंवा खाण्याच्या गोष्टी यांची त्यांना आसक्ती नाही.

२. प्रेमभाव

२ अ. उत्तम वैद्याचे गुण असलेल्या वैद्या अपर्णाताई ! : मी आश्रमात रहायला आल्यानंतर मी माझे त्रास ताईंना सांगत असे. ताईंच्या प्रेमभावामुळे मला होणारे त्रास आणि माझ्या मनाची स्थिती मी त्यांना मनमोकळेपणाने सांगू लागले. रुग्णाला सांभाळण्यासाठी एका उत्तम वैद्यात ज्या गुणांची आवश्यकता असते, ते सर्व गुण ताईंमध्ये आहेत.

२ आ. साधिकेतील नकारात्मकतेवर मात करण्यास तिला प्रोत्साहन देणे : काही दिवसांपूर्वी मला पुष्कळ थकवा आला होता. मी लहान लहान कृतीही करू शकत नव्हते. त्यामुळे मला ताण आला होता. त्या वेळी माझ्या मनात ‘माझे स्वभावदोष वाढले आहेत’, असे नकारात्मक विचार यायचे. तेव्हा ताईंनी मला समजावले, ‘सध्या तुझा त्रास वाढल्याने तू काही करू शकत नाहीस; पण तू ठीक झाल्यावर पुन्हा सर्व कृती करू शकशील. तू नकारात्मक विचार करू नकोस.’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्रासाची तीव्रता अल्प झाल्यावर मी सहजपणे कृती करू लागले.

२ इ. साधिकेची स्थिती समजून घेऊन तिला आधार देणे : मी ताईंच्या समवेत उपचारांसाठी एका आयुर्वेदीय चिकित्सालयात गेले होते. मला रात्री झोप येत नसे आणि माझे पायही पुष्कळ दुखायचे. तेव्हा ताई रात्री जागून मला साहाय्य करायच्या आणि दिवसभर रुग्णांवर उपचार करायच्या. मी कधी कधी ताईंवर चिडत असे. तेव्हा त्या मला समजून घेत असत. नंतर मी ताईंची क्षमा मागायची. तेव्हा ‘तू ठीक झाल्यावर या स्थितीतून बाहेर येशील’, असे ताईंनी मला प्रेमाने समजावले.

३. सेवेची तळमळ

सुश्री (कु.) पूनम चौधरी

काही दिवसांपूर्वी अपर्णाताईंना शारीरिक त्रास होत होता; परंतु त्यावर मात करून त्या साधकांवर उपचार करत होत्या.

४. प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्णाचे साहाय्य घेणे

अ. एकदा सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाकांनी अपर्णाताईंना सांगितले, ‘‘भावाच्या स्तरावर उपचार केले पाहिजेत.’’ तेव्हापासून ताई भावाच्या स्तरावर उपचार होण्यासाठी प्रत्येक साधकावर उपचार करण्यापूर्वी प्रथम श्रीकृष्णाला प्रार्थना करतात.

आ. एखाद्या सूत्राविषयी दुमत असेल, तर ताई आधी श्रीकृष्णाला प्रार्थना करतात आणि त्याने सांगितलेले उत्तरदायी साधकाशी बोलून नंतर निर्णय घेतात.

इ. ताई मितभाषी आहेत. त्या सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहातात. काही प्रसंग घडल्यास त्या मनमोकळेपणाने सांगतात. त्या म्हणतात, ‘‘तो प्रसंग माझ्या मनात राहिला, तर मी श्रीकृष्णाला अनुभवू शकणार नाही. यासाठी मी प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्णाचे साहाय्य घेते.’’

ई. पूर्वी मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होत असे. मी ताईंकडे औषध घेण्यास गेले की, त्या मला विचारत, ‘तू श्रीकृष्णाला तुझा त्रास सांगितलास का ?’ ‘श्रीकृष्णच आपले वैद्य आहेत’, असे त्या नेहमी म्हणतात. त्यामुळे मी शारीरिक त्रास आधी श्रीकृष्णाला सांगते. त्यामुळे ‘प्रत्येक परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे?’, हे श्रीकृष्ण माझ्या लक्षात आणून देतो.

५. वैद्यकीय उपचार करत असतांना

५ अ. साधकाची स्थिती पाहून त्याच्या त्रासाचे कारण सांगणे : ताईंकडे औषधोपचारासाठी गेल्यावर त्या सांगतात, ‘तुझ्या मनात काहीतरी विचार चालू आहेत. त्यामुळे तुझा त्रास वाढला आहे. तू तुझे विचार शोधून त्यावर प्रयत्न कर.’ मला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर त्या मला नामजपादी उपाय करण्यास सांगतात.

५ आ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : साधकांच्या नाडी तपासणीतून त्या ‘साधकांना शारीरिक त्रासासमवेतच आध्यात्मिक आणि मानसिक त्रास किती प्रमाणात आहेत ?’ हेही सांगतात.

५ इ. अपर्णाताईंच्या माध्यमातून साक्षात् धन्वन्तरि देवता उपचार करत असल्याचे वाटणे : ताईंमध्ये भाव असल्याने त्यांच्याकडे उपचारांसाठी जाण्यापूर्वी ‘मी साक्षात् धन्वन्तरि देवतेकडे उपचारांसाठी जात आहे’, असा भाव मनात असतो. ‘ताईंच्या माध्यमातून साक्षात् धन्वन्तरि देवता माझी नाडीपरीक्षा करत आहे’, असे मला वाटते.

६. अन्य सूत्रे

६ अ. ताई परिस्थितीत न अडकता तिच्यातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.

६ आ. तत्त्वनिष्ठ असणे : माझ्याकडून काही चूक झाली, तर त्या मला फळ्यावर चूक लिहिण्यास सांगतात.

६ इ. ताईंनी दिलेले साधनेचे दृष्टीकोन अंतर्मनापर्यंत जाणे : ताई सांगतात, ‘आपण करत असलेल्या साधनेतून ‘आपल्याला आनंद मिळत आहे ना ? श्रीकृष्णाचे स्मरण होत आहे ना ?’ याचा आपल्याला अंतर्मुख होऊन सतत विचार करायचा आहे. ‘आनंद मिळाला, तर साधना योग्य दिशेने चालू आहे’, असे त्या सांगतात.

अपर्णाताईंच्या रूपाने गुरुदेवांनी आम्हाला आध्यात्मिक वैद्या आणि आध्यात्मिक मैत्रीण दिली आहे. ताईंकडून त्यांचे गुण शिकण्याची संधी मला दिली, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात.या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.