|
शिरगांव (गोवा), १४ मे (वार्ता.) – येथील श्री लईराईदेवीच्या जत्रेच्या वेळी पेटवल्या जाणार्या पवित्र होमकुंडामुळे पर्यावरणाची हानी होते, अशी हिंदुद्वेषी ‘पोस्ट’ सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित करणार्या स्वीडेल रोड्रीगीज या ख्रिस्ती युवतीच्या विरोधात श्री लईराई देवस्थान समितीने डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे, ‘गावसवाडा, म्हापसा येथील स्वीडेल रोड्रीगीज नावाच्या ख्रिस्ती युवतीने श्री लईराईदेवीच्या जत्रेत पेटवण्यात येणार्या पवित्र होमकुंडावर आक्षेप घेत सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे एक पोस्ट प्रसारित केला आहे. या पोस्टमध्ये तिने ‘मला कळत नाही तुम्ही याला संस्कृती किंवा परंपरा कसे म्हणू शकता ? आणि अशा प्रकारे पर्यावरणाची हानी करत असतांना कुणाचीही प्रशंसा कशी करू शकता ?’, असा मजकूर लिहिला आहे. शिरगाव येथील श्री लईराईदेवीची जत्रा ही पुष्कळ प्रसिद्ध आहे. केवळ गोव्यातीलच नव्हे, तर कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतील भाविकही या जत्रेसाठी येतात. या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यरात्री पेटवल्या जाणार्या या होमकुंडातून व्रतस्थ धोंड सहस्रोंच्या संख्येने रखरखत्या निखार्यांवरून चालत जातात. ही या देवीची किमया आहे की, हे अग्निदिव्य करतांना ती आपल्या भक्तांचे रक्षण करते. गोव्याची संस्कृती आणि धार्मिक परंपरा अशा जत्रोत्सवाच्या माध्यमातून टिकवण्याचे काम केवळ हिंदु लोकच नव्हे, तर या जत्रेला येणारे ख्रिस्ती लोकही करत आहेत. असे असतांना हा पोस्ट लिहून या युवतीने थेट लोकांच्या श्रद्धेला हात घातला आहे. हा पवित्र होमकुंडाचा, म्हणजेच श्री लईराईदेवीचा अपमान आहे. हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या युवतीविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या ‘कलम २९५ अ’ नुसार धार्मिक भावना दुखावल्याविषयी गुन्हा नोंदवून प्रथमदर्शी अहवाल नोंद करावा, अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे तिला जाहीररित्या हिंदूंची क्षमा मागायला भाग पाडावे, अशीही मागणी आम्ही करत आहोत.’
"SENTIMENTS OF LAIRAI DEVOTEES HURT" pic.twitter.com/LDd7yJT2eX
— Prudent Media (@prudentgoa) May 14, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ख्रिस्ती युवतीविरुद्ध तक्रार करणार्या श्री लईराई देवस्थान समितीचे अभिनंदन ! असे जागरूक हिंदू, हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे ! समस्त हिंदूंनीही देवस्थान समितीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि हिंदुद्वेष्ट्या युवतीविरुद्ध कायदेशीर कारवाई होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे ! |