महाराष्ट्रात ‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ या मांसाहार पदार्थांची उघड्यावर सर्रासपणे विक्री !

कारवाई न करणार्‍या प्रशासनाच्या विरोधात सुराज्य अभियानाची शासनाकडे तक्रार !


मुंबई, १४ मे (वार्ता.) – ‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ हे मांसाहारी पदार्थ महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये उघड्यावर सर्रासपणे विकले जात आहेत. अवैधरित्या विक्री होत असूनही, तसेच आरोग्याला हानीकारक असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांवर कारवाई होत नाही. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून आरोग्यमंत्री, तसेच अन्न आणि औषध प्रशासनमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा प्रकारे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आरोग्य विभागाला पाठवावा. यामध्ये दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी तक्रारीमध्ये केली आहे.

श्री. अभिषेक मुरुकटे यांनी लिहिले आहे की,…

१. २४ घंट्यांनंतर ‘शोर्मा’ या पदार्थामध्ये मानवी प्रकृतीला हानीकारक द्रव्ये निर्माण होतात. त्यातील मांस कधीपर्यंत टिकाऊ आहे, याची कालमर्यांदा देण्यात येत नाही. कालबाह्य मांस खाल्ल्यामुळे त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते.

२. शोर्मा खातांना त्यावर ‘मेयॉनीझ’ हा पांढर्‍या रंगाचा ‘सॉस’ वापरला जातो. अंड्यातील बलक वापरला जातो. तो योग्यरित्या साठवला जातो का, याविषयी शाश्‍वती नसते.

३. काही दिवसांपूर्वी चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस वापरण्यात आल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. हा मांसाहारी पदार्थ रस्त्याच्या कडेला उघड्यावर वाफेवर गरम करून देण्यात येतो. मोमोजमध्ये वापरण्यात येणारे ‘आजोडिकार्बोनामाईड’ आणि ‘बेझॉईल पॅरॉक्साईड’ हे शरिरासाठी हानीकारक आहे. यातून मधुमेहासारखे विकार बळावत आहेत.

शोर्मातून विषबाधा होऊन मुंबईसह विविध राज्यांत मृत्यू !

मुंबईतील मानखुर्द येथे मे २०२४ मध्ये चिकन शॉर्मातून विषबाधा होऊन प्रथमेश घोक्षे या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आनंद कांबळे आणि महंमद अहमद रेजा शेख यांना अटक करून गुन्हा नोंदवला. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथेही शोर्मातून १२ जणांना विषबाधा झाली. केरळ आणि तमिळनाडू राज्यांतही शोर्मातून विषबाधा अन् त्यातून मृत्यूचे प्रकार घडल्याचे अभिषेक मुरुकटे यांनी या तक्रारीतून शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने थातूरमातूर कारवाई !  

शोर्मा आणि मोमोज यांच्या उघड्यावरील अवैध विक्री विरोधात श्री. अभिषेक मुरुकटे यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार केली होती; मात्र त्याला उत्तर देण्याचीही तसदी प्र्रशासनाने घेतली नाही. ७ मे या दिवशी मानखुर्द येथे शोर्मातून विषबाधेने युवकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केल्याचे ९ मे या दिवशी श्री. अभिषेक मुरुकटे यांना कळवले. यामध्येही मुंबईतील केवळ एका प्रभागामध्ये शोर्मा आणि मोमोज यांच्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे म्हटले आहे; मात्र त्याचा कोणताच तपशील दिलेला नाही, असे श्री. अभिषेक मुरुकटे यांनी सांगितले.

अशा प्रकारे उघड्यावर होणार्‍या मांसविक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य वेठीस धरले जात आहे. त्यामुळे कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता प्रशासनाने यांवर स्वत:हून कारवाई करावी, अशी मागणी श्री. मुरुकटे यांनी सुराज्य अभियानाद्वारे केली आहे.

संपादकीय भूमिका

वास्तविक अशी तक्रार करण्याची वेळ का येते ? अन्न आणि औषध प्रशासन काय करीत आहे ?