राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांचे नावच मतदारसूचीत नाही !

गायिका सावनी रवींद्र (छायाचित्र सौजन्य : PC LIVE 7)
मतदार सूचीत नाव नसल्यामुळे अभिनेता सुयश टिळक मतदानापासून वंचित !

मुंबई – मतदार सूचीत नाव नसल्यामुळे अभिनेता सुयश टिळक यांना मतदान करता आले नाही. याविषयी स्वत:च्या ‘एक्स’ खात्यावरून त्यांनी माहिती दिली आहे. यामध्ये सुयश टिळक म्हणाले की, सकाळी ७ वाजता मतदान करण्यासाठी गेलो. माझ्याकडील ऑनलाईन सूचीत माझे नाव होते; मात्र मतदान केंद्रावरील सूचीत वेगळेच नाव होते. काही मतदारांचा मतदारसंघ पालटला असल्याचे कळल्यावर मी वेगळ्या मतदारसंघातही चौकशी केली. ३ घंटे वेगवेगळ्या मतदारसंघांत जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्नही केला; परंतु त्या ठिकाणीही वेगळेच नाव होते. अन्य कोणत्या मार्गानेही मला मतदान करू देण्यात आले नाही. मागील वेळीही माझे मतदार सूचीतील नाव चुकले होते. सुधारणा अर्ज देऊन मी ते दुरुस्त करून घेतले. मागील अनेक वर्षे मी न चुकता मतदान करत आहे.

मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांना त्यांचे नाव मतदारसूचीत नसल्याने लोकसभेसाठी मतदान करता आले नाही. लोकसभेसाठी राज्यातील चौथ्या टप्प्यासाठीचे मतदान १३ मे या दिवशी पार पडले. राज्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी हे मतदान झाले. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहिल्यानगर, शिर्डी, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

याविषयी सावनी रवींद्र यांनी ‘इन्स्टाग्राम’वर सांगितले, ‘‘गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टलवर मतदारांच्या सूचीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही ते सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील उर्वरित सर्व सदस्यांची नावे आहेत; पण माझे नाव नव्हते. निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेतली. अन्य कोणत्या पर्यायाने मतदान करू शकते का ? याविषयी विचारले; पण त्यांनी नकार दिल्याने मत न देताच मला परत यावे लागले. हे अत्यंत खेदजनक आहे.

मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार या वेळी अनेक ठिकाणी घडल्याचे दिसून आले. काही मतदारांची नावे तर सूचीतून पुसली गेल्याचे (डिलीट झाल्याचे) समजते. (मतदानाच्या संदर्भात झालेला सावळा गोंधळ ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • मतदार सूचीतील नावांचा सर्वत्र असणारा प्रचंड गोंधळ ‘डिजिटलायझेशन’च्या गोष्टी करणार्‍या भारतासाठी लज्जास्पद !
  • लोकशाही असणार्‍या भारतात मतदानापासूच वंचित रहावे लागणे दुर्दैवी !